मुंबई: रस्त्याने जाणाऱ्या तरुण-तरुणीला बनावट नोटांचे बंडल हातात देऊन दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळी घेऊन पोबारा केला. भांडुप परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून त्याबाबत तरुणीने केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

जमीला खान (२१) असे यातील तक्रारदार तरुणीचे नाव असून ती भांडुपच्या तुलशेत पाडा या परिसरात राहते. शनिवारी ती परिसरात राहणाऱ्या दिलीप या मित्रासह भांडुप स्टेशन रोड येथे काही खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी त्या दोघांना रस्त्यात दोन अनोळखी इसम भेटले. आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या बनावट नोटांचे बंडल दाखवून त्या बदल्यात तरुण आणि तरुणीकडे सोनसाखळीची मागणी केली. दोन सोनसाखळीच्या बदल्यात पिशवी भरून पैसे मिळत असल्याने तत्काळ दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून आरोपींना दिल्या.

आरोपींनीही तत्काळ त्यांच्याकडे असलेली बनावट नोटांची पिशवी तरुणीच्या हातात देऊन पैसे तपासून घेण्यात सांगितले. त्यानुसार दोघे पैशांची पिशवी घेऊन तपासण्यासाठी आडोशाला गेले. त्याचवेळी दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तरुण आणि तरुणीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.