मुंबई : मध्य, कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन अतिजलद एक्स्प्रेसला नव्या वर्षात लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास आणखी वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
गेल्या काही कालावधीपासून अनेक जुन्या पारंपरिक आयसीएफ बनावटीचे डब्याचे रूपांतर एलएचबी डब्यात केले जात आहे. नुकताच गांधीधाम – नागरकोइल एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजीपासून ही रेल्वेगाडी एलएचबी डब्यासह धावणार आहे. तर, कोकण रेल्वेवरील मुंबई आणि मंगळुरूला जोडणाऱ्या सर्वात वेगवान दैनंदिन एक्स्प्रेसला मार्च २०२५ रोजी एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा – नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेसचा सरासरी वेग ताशी ६२ किमी असून ही एक्स्प्रेस १४ तास ३० मिनिटांत ८९४ किमी अंतर कापते. तथापि, पावसाळ्यात तिचा वेग सरासरी ताशी ५२ किमी असतो. त्यामुळे प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी खूप महत्त्वाची आहे. या रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडण्याची अनेक प्रवासी संघटनांची मागणी होती. त्यामुळे गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेसला १ मार्च २०२५ रोजी सीएसएमटीवरून एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. तर, गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसला २ मार्च २०२५ रोजी एलएचबी डबे जोडण्यात येतील. त्यामुळे या रेल्वेगाडीची संरचना द्वितीय श्रेणी वातानुकूलित दोन डबे, तृतीय श्रेणी वातानुकूलित तीन डबे, शयनयान ५ डबे, सामान्य डबे ४, जनरेटर कार एक आणि एसएलआर एक डबा अशी असेल. या रेल्वेगाडीला एकूण १६ एलएचबी डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.