मुंबई : पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) जनुकीय अहवालांमध्ये बी. ए. ५ चे सात तर बी. ए. ४ चे दोन असे नऊ रुग्ण मंगळवारी आढळले. बी. ए. ४ आणि बी. ए. ५ चे हे रुग्ण ३१ मे ते ११ जून या काळात करोनाबाधित झाले होते. यामध्ये सर्वाधिक पाच रुग्ण हे २६ ते ५० वयोगटातील तर ० ते १८ आणि १९ ते २५ वयोगटातील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. यामध्ये सहा पुरुष आणि तीन स्त्रियांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण लक्षणेविरहित असून घरगुती विलगीकरणाच बरे झाले. यातील एक रुग्ण वगळता सर्वाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बी. ए. ४ आणि बी. ए. ५ रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. यापैकी पुण्यात १५, मुंबईत ३३, नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४  तर रायगड मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत.

राज्यात ३, ४८२ रुग्णांचे नव्याने निदान

राज्यात मंगळवारी ३,४८२ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर ३ हजार ५६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील मृतांच्या संख्येत काही अंशी वाढ झाली असून राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबई पालिकेमध्ये दोन तर वसई-विरार, सातारा आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २५ हजार ४८१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

व्हिडीओ पाहा –

मुंबईत मंगळवारी १,२९० नवे रुग्ण

मुंबई : मुंबईत सोमवारी चाचण्या कमी झाल्याने मंगळवारी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी १,२९० रुग्ण आढळले असून १,७७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  शहरात दोन रुग्णांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. यातील एक रुग्ण ७५ वर्षांचा असून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, स्मृतिभ्रंश असे दीर्घकालीन आजार होते. दुसऱ्या मृत रुग्णाचे वय ५४ वर्षे होते. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाबासह यकृत आणि मूत्रिपडाचे आजार होते. मंगळवारी बाधित आढळलेल्या रुग्णापैकी १०५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून सध्या ६१८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात सध्या ११ हजार ९८८ रुग्ण उपचाराधीन आहेत.