मुंबईः वरळी सीफेस परिसरात बीएमडब्ल्यू मोटरगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तरुण विनोद लाड (२८) याचा शनिवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे कलम वरळी पोलिसांनी वाढवले आहे.
विनोद लाड (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफार खान रोडवर २० जुलैला विनोदला मागून येणाऱ्या मोटरगाडीने धडक दिली होती. त्याच्यावर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान शनिवारी विनोदला मृत्यू झाला. मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. २० जुलैला विनोद कामावरून वरळी येथील हिलरोड येथील घरी परतत होता. त्यावेळी मागून येणाऱ्या मोटरगाडीने विनोदला मागून धडक दिली. त्यावरून मोटरसायकलवरून खाली पडून विनोदच्या डोक्याला मार लागला. त्याला अपघातग्रस्त मोटरगाडीच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या मोटरगाडीने विनोदला नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गेले आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू) वाढवले आहे.
अपघात झाला, त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर गाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विनोद प्रतिसाद देत होता
अपघातानंतर जखमी झालेला विनोद नायरमधील अतिदक्षता विभागात दाखल होता. बेशुद्धवस्थेत असताना वैभव जाधव त्याची सुश्रुषा करत होते. त्यावेळी माझे बोलणे त्याच्यापर्यंत पोहोचत असल्याचे मला जाणायचे. तो त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याची मृत्यूशी झुंज फार काळ नाही टिकली. आम्ही कामालाही एकत्र होतो. विनोद सर्वांशी हसत-खेळत असायचा. त्यामुळे त्याचा हसरा चेहरा आजही डोळ्यासमोर आहे, असे जाधव यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd