‘बेस्ट’ची धाव अपुरी!

मेट्रो, रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पाच वर्षांत बेस्टच्या फेऱ्या घटल्या असून याचा परिणाम प्रवासीसंख्येवरही होत आहे.

मेट्रो, रस्त्यांची कामे, वाहतूक कोंडीमुळे फेऱ्यांत लक्षणीय घट

मुंबई : मेट्रो, रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पाच वर्षांत बेस्टच्या फेऱ्या घटल्या असून याचा परिणाम प्रवासीसंख्येवरही होत आहे. पाच वर्षांपूर्वी दिवसभर सरासरी दोनशे किमी धावणारी ‘बेस्ट’ची एक बस सध्या १६० किमीपर्यंतच प्रवास करू शकते. परिणामी प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक वेळ बससाठी ताटकळत राहावे लागत आहे. याची दखल घेत बेस्टच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रवाशांच्या घटत्या संख्येमुळे बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी उपक्रमाने काही वर्षांपूर्वी वातानुकूलित बसगाडय़ा दाखल केल्या. मात्र निकृष्ट दर्जा, अपुरी देखभाल, वाहतूक कोंडीत बंद होणाऱ्या बस यामुळे कालांतराने या गाडय़ा बेस्टसाठी डोकेदुखी ठरल्या. त्यामुळे ताफ्यातील सर्व वातानुकूलित गाडय़ा एप्रिल २०१७ मध्ये बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर आता प्रवाशांसाठी साध्या गाडय़ांबरोबरच पुन्हा वातानुकूलित बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत. यामध्ये मिडी, मिनी व मोठय़ा बसगाडय़ांचाही समावेश आहे. मात्र या गाडय़ाही मेट्रो, रस्त्यांची विविध कामे आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकत असल्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढला आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा कालावधी वाढला असून त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांपर्यंत गाडय़ा अधिकाधिक पोहोचू शकत नाहीत, असे आढळले आहे. परिणामी प्रवासी संख्या वाढत नाही आणि बेस्टच्या तिजोरीतही भर पडत नसल्याचे सांगितले. मुंबईत मोठय़ा प्रमाणात मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. याशिवाय रस्त्यांची दुरुस्ती कामे सुरूच असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन बेस्ट जास्तीत जास्त धावू शकत नाही, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

दोन महिन्यांत आणखी ३५० बस

येत्या दोन महिन्यांत भाडेतत्त्वावरील आणखी ३५० बेस्ट बस दाखल होतील. सीएनजीवर धावणाऱ्या साध्या प्रकारातील एकमजली मोठय़ा बस असतील. सध्या ३,४०० पर्यंत बस आहेत. यात मिडी, मिनी व मोठय़ा आकारातील साध्या व वातानुकूलित बसचा समावेश आहे. मार्च २०२३ पर्यंत ताफ्यातील ६५ टक्के बस वातानुकूलित असतील. तर २०२७ पर्यंत १०० टक्के बस वातानुकूलित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या वेळीही बसचा ताफा ५,४०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

महिला विशेष बस फेऱ्यांवर लक्ष केंद्रित

सध्या १३६ महिला विशेष बस गाडय़ा धावतात. यात तेजस्विनी नावाने धावणाऱ्या ३६ बस आहेत. उर्वरित बसमध्ये दिवसभरातील काही वेळेत फक्त महिलांनाच प्रवेश देण्यात येतो. अशा १०० बसमधून गर्दीच्या वेळेत २० ते २५ हजार महिला प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आणखी काही नियोजन करता येऊ शकते का, याची चाचपणी ‘बेस्ट’ उपक्रमाकडून सुरू आहे. यात रेल्वेच्या महिला विशेष फेऱ्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकाबाहेर ‘बेस्ट’च्या महिला बस उपलब्ध करण्याचाही समावेश आहे.

अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी आता बेस्ट गाडय़ांची संख्या वाढवण्याबरोबरच फेऱ्यांचेही नियोजन केले जात आहे. मेट्रो, मोनो आणि रेल्वे स्थानकांपर्यंत ‘बेस्ट’ला कसे जोडता येईल, यानुसार नियोजन करण्यात येत आहे.

लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, ‘बेस्ट’ उपक्रम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Incomplete run best ysh

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या