मुंबई : तमिळनाडूमधील वेलांकन्नी उत्सवानिमित्त पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून भाविकांसाठी विशेष रेल्वेगाडीची सुविधा देण्यात येते. मात्र भाविकांची संख्या लक्षात घेता, ही सोय अपुरी पडल्याने, प्रवाशांना विमान व खासगी बसने वेलांकन्नी जावे लागले. तसेच अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावल्याने प्रवाशांचा प्रचंड मोठा खोळंबा झाला. याबाबत प्रवाशांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापकांना ईमेलद्वारे तक्रारी केल्या आहेत.
वेलांकन्नी उत्सवासाठी २७ ऑगस्ट रोजी वसई रोड रेल्वे स्थानकावरून दुपारी २ वाजता गाडी क्रमांक २२४९७ तिरुच्छिरापल्ली हमसफर एक्सप्रेस सुटणार होती. ही रेल्वेगाडी पकडण्यासाठी भाविक दुपारी १ वाजता स्थानकात आले होते. मात्र, तब्बल १३ तास उशिराने म्हणजेच पहाटे ३ वाजता या रेल्वेगाडीचे आगमन वसई रोड स्थानकात झाले. त्यामुळे शेकडो भाविकांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना मधुमेह असलेल्या प्रवाशांना वेळेत औषधे आणि जेवण मिळाले नाही. तसेच स्थानकात नैसर्गिक विधीसाठी सुविधा नसल्याने भाविकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. प्रवाशांना पुढील प्रवासाचे आगाऊ आरक्षण रद्द करावे लागले. तसेच खर्च केलेल्या रकमेवर पाणी सोडावे लागले.
रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना योग्यरित्या प्रवास करता आला नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापकांकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. तसेच याची चौकशी करून दोषीवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे ज्येष्ठ समाजसेवक चार्ली रोझारिओ यांनी सांगितले.