मुंबई : काळी-पिवळी रिक्षा, टॅक्सीचा प्रवास १ ऑक्टोबरपासून महागणार असून रिक्षाच्या भाडय़ात दोन, तर टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ करण्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. भाडेदरात वाढ केल्याने रिक्षाचे सध्याचे दीड किलोमीटर या पहिल्या टप्प्याचे किमान भाडे २१ रुपयांऐवजी २३ रुपये होईल, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांऐवजी २८ रुपये होईल. कुल कॅबचेही भाडेदर महागले असून दीड किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपयांऐवजी ४० रुपये होणार आहे.

गेल्या वर्षी १ मार्च २०२१ ला भाडेवाढ झाली होती. त्या तुलनेत सध्याच्या दरात सीएनजीच्या दरात वाढ असून प्रति किलो ४९.४० रुपयांवरून आता ८० रुपये सीएनजी दर झाला आहे. त्यामुळे खटुआ समितीच्या शिफारशींच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक आणि वाढलेले इंधनाचे दर, तसेच इतर बाबी विचारात घेऊन ही वाढ देण्यात आल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन भाडेदरासाठी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करावे (रिकॅलिब्रेशन) लागणार असून १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबपर्यंत बदल करण्याच्या सूचन करण्यात आल्या आहेत. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत भाडेदर कार्ड ३० नोव्हेंबपर्यंतच लागू राहील. त्यामुळे मीटरमध्ये बदल करणे गरजेच असल्याचे सांगण्यात आले. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये पेट्रोलवरील रिक्षांनाही सीएनजी इंधनावर चालणाऱ्या रिक्षांचेच दर लागू राहतील.