मुंबई : करोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळानंतर चांगल्याच सावरलेल्या बांधकाम उद्योगाला आता झळाळी येत आहे. आतापर्यंत झालेल्या घरविक्रीच्या पाश्र्वभूमीवर घरांची मागणी आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे. मॅजिक ब्रिक्सने जारी केलेल्या यंदाच्या तिमाहीतील मालमत्ता निर्देशांकानुसार मुंबई, नवी मुंबईत घरांची मागणी १५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
या निर्देशांकानुसार मुंबईतील घरांची मागणी १५ टक्क्यांनी वाढली. त्याचवेळी घरांच्या उपलब्धतेतही सव्वातीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील जागांच्या किमती पाहता लहान आकाराच्या एक आणि दोन बीएचके घरांना खरेदीदारांनी पसंती दर्शविली आहे. एक बीएचकेसाठी उपलब्घ घरांचा साठा ७३ टक्के होता तर मागणी ६९ टक्के होती. दोन बीएचके घरांची मागणी आणि पुरवठा अनुक्रमे ४० आणि ४२ टक्के असल्याचेही आढळून आले आहे.
यंदाच्या वर्षांत पहिल्या तिमाहीत नवी मुंबईत दोन बीएचकेची मागणी सर्वाधिक होती. या घरांच्या मागणी आणि पुरवठय़ाचे प्रमाण ४८ आणि ४६ टक्के होते, असेही या अहवालात म्हटले आहे. ठाण्यातही लहान घरांना अधिक मागणी कायम राहिली. छोटय़ा आकाराच्या एक आणि दोन बीएचके घरांसाठी मागणीचे प्रमाण ७८ टक्के होते. परंतु उपलब्धता मात्र ४३ टक्के होती, असेही या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत मालाड आणि कांदिवली या ठिकाणी सर्वाधिक घरांची विक्री झाली. चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलतीमुळे भविष्यात घरांची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता होणार आहे. याबाबत ट्रान्सकॉन डेव्हलपर्सच्या श्रद्धा केडिया-अग्रवाल म्हणाल्या की, मेट्रो अंशत: कार्यान्वित झाल्यामुळे मालाड-कांदिवली परिसराचे महत्त्व वाढले आहे. या परिसरात उत्तुंग टॉवर्स मोठय़ा प्रमाणात उभे राहत असून खरेदीदारही आकर्षित होत आहेत. उर्वरित मुंबई महानगर प्रादेशिक विभागाशी संपर्क वाढत असल्यामुळे नवीन पनवेल, खारघर, ऐरोली, तळोजा, वाशी, कामोठे आणि नेरुळ या ठिकाणांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. ठाण्यात, घोडबंदर रोड आणि डोंबिवली परिसरालाही मागणी वाढत आहे.
रुणवाल ग्रुपचे कार्यकारी संचालक रजत रस्तोगी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ठाणे-डोंबिवली परिसर वेगाने वाढत आहे. या ठिकाणी घरांना अधिक मागणी
आहे.
भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच मुंबई व नवी मुंबईशी वाहतूक संपर्क वाढत असल्यामुळे घर खरेदीदार या परिसराला प्राधान्य देत आहेत.
घरातून काम करण्याती संकल्पना जोर धरत असल्यामुळे संभाव्य गृहखरेदीदार शहराच्या परिघावर मोठी घरे विकत घेऊन शहराजवळ राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत, असे त्यांनी सांगितले.