मुंबई : तिकीट दर कपातीनंतर पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट विक्रीतही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवर मात्र या तिकीट विक्रीत फारशी वाढ झालेली नाही. अनेकांनी प्रथम श्रेणीपेक्षा वातानुकूलित लोकलमधून जाणे पसंत केल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मे पासून ५० टक्केपर्यंत कपात करण्यात आली. सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीचेही तिकीट दर कमी केले गेले. हे दर कमी होताच वातानुकूलित लोकलच्या तिकीट विक्रीत वाढ झाली. उकाडा आणि कमी झालेल्या तिकीट दरांमुळे वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला. याबरोबरच सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचा आढावा घेतल्यास पश्चिम रेल्वेवर त्यात वाढ असून, मध्य रेल्वेवर मात्र फारशी वाढ दिसून येत नाही.

एप्रिल महिन्यात प्रथम श्रेणीची दररोज ४,५७७ तिकीट विक्री होत असे. त्यानंतर १ ते ४ मेपर्यंत दररोज सरासरी ४,९५३ तिकीट विक्री झाली. तर ५ मे पासून म्हणजेच तिकीट दरात कपात होताच १८ मेपर्यंत दररोज सरासरी ६,८९५ तिकीट विक्री होत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली. यावरून वातानुकूलित लोकलबरोबरच प्रथम श्रेणीच्या तिकीट विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येते. वाहनधारक किंवा वातानुकूलित टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वातानुकूलित लोकल बरोबरच प्रथम श्रेणीच्या प्रवासाला पसंती दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मध्य रेल्वेवरही प्रथम श्रेणीच्या तिकीट विक्रीत फारशी वाढ झालेली नाही. सरासरीच प्रतिसाद मिळाला आहे. १ ते ४ मे दरम्यान सर्वाधिक तिकीट विक्री ही ३ मे रोजी झाली. त्या दिवशी २,१९९ तिकीट विक्री झाली. ५ मेपासून प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात कपात होताच ८ मे रोजी सर्वाधिक ३,५८० आणि १५ मे रोजी ३,८२८ तिकिटांची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली.