मुंबई : बांधकाम साहित्यात झालेल्या दरवाढीबरोबरच घरांच्या मागणीतही वाढ झाल्याने मुंबई महानगर घरांच्या किमतीही पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. नजीकच्या काळातही घरांच्या किमतींची वाढ कायम राहील, असा दावा करण्यात येत आहे. कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) यांच्या पुढाकाराने ‘कोलिएर्स-लायसेस फोरास’ने  ‘हौसिंग प्राईस ट्रॅकर’ अहवाल जारी केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

दिल्ली परिसरातील घरांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत तर, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे ९ व ८ टक्के वाढ नोंदवली. बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ आणि घरांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे घरांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मुंबई महानगर परिसरातील विकल्या न गेलेल्या घरांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढली आहे. विकल्या न गेलेल्या घरांमध्ये मुंबई महानगर परिसरातील घरांचा वाटा सर्वाधिक म्हणजे ३६ टक्के आहे. या परिसरात अनेक नवीन प्रकल्प सुरू झाल्यामुळे विकल्या न गेलेल्या घरांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत पश्चिमेकडील उपनगरांमध्ये (दहिसरपलीकडील) गेल्या वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे १२ टक्के वाढ दिसून आली आहे. मध्यवर्ती उपनगरांच्या विस्तारित भागातील विकली न गेलेल्या घरांची संख्या २६ टक्के आहे.