scorecardresearch

घरांच्या किंमतीत वाढ अपरिहार्य; क्रेडाईची पोस्टरबाजी, वाढत्या बांधकाम साहित्यदराचे कारण 

करोना तसेच त्यानंतरच्या काळात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट यासह प्रमुख साहित्यांमध्ये सतत वाढ होत असून त्यामुळे घरांच्या किमती ६०० ते ८०० रुपये प्रति चौरस फूट किमतीने वाढणार आहेत.

मुंबई : करोना तसेच त्यानंतरच्या काळात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट यासह प्रमुख साहित्यांमध्ये सतत वाढ होत असून त्यामुळे घरांच्या किमती ६०० ते ८०० रुपये प्रति चौरस फूट किमतीने वाढणार आहेत. ‘कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडिया’ म्हणजेच क्रेडाईने याबाबत पोस्टरबाजी सुरू केली असून ग्राहकांनी आता घरांच्या वाढत्या किमतींना सामोरे जावे, असे आवाहन केले आहे.

क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शाह यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, बांधकाम साहित्याच्या २०१७ मध्ये ज्या किमती होत्या, त्याचा विचार केला तर त्या २०२१ मध्ये वाढल्या. तरीही विकासकांनी घरांच्या किमतीत वाढ न करण्याचे ठरविले. परंतु यंदाच्या वर्षांत त्यात पुन्हा वाढ झाली. यावेळी वाढ भरमसाट आहे. ती सहन करणे आता विकासकांच्या आवाक्यात नाही. त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ अपरिहार्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रेडाई चेन्नई व तमिळनाडू यांनी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर या वाढत्या दरांचा तक्ताच दिला आहे. देशभरात याचा परिणाम दिसून येणार असल्याचेही शाह यांनी सांगितले. २०१७ मध्ये लोखंडाचा किलोमागे भाव ३७.६० रुपये होता. तो २०२१ मध्ये ६४.५० रुपये झाला. मात्र यंदा तो ८२ रुपये झाला आहे. ही वाढ भरमसाट आहे. सिमेंटची गोणी जी २०१७ मध्ये ३३० रुपये होती ती २०२१ मध्ये ३६५ वर पोहोचली. पण आता ४३० रुपये इतकी झाली आहे. बांधकामासाठी लागणारी वीट जी चार रुपयांच्या आसपास मिळत होती ती आता १२ रुपये झाली आहे. इतर बांधकाम साहित्यांचे २०१७ मध्ये जे दर होते त्यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase house prices inevitable credai poster campaign rising construction materials prices ysh

ताज्या बातम्या