scorecardresearch

रेल्वेच्या हद्दीतील गुन्हेगारीत वाढ ; मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत १४ हजार गुन्हे

करोनापूर्व काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेतून ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करीत होते.

रेल्वेच्या हद्दीतील गुन्हेगारीत वाढ ; मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत १४ हजार गुन्हे
( संग्रहित छायचित्र )

मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत खून, चोरी, दरोडे, विनयभंग इत्यादी गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यात आले आहे. रेल्वेच्या हद्दीत जानेवारी २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत विविध प्रकारचे एकूण १४ हजार ३३४ गुन्हे घडले. जानेवारी – डिसेंबर २०२१ या काळात विविध प्रकारच्या सहा हजार ७१९ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढून सात हजार ६१९ वर पोहोचले आहे. एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे त्यांची उकल करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे.

करोनापूर्व काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेतून ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करीत होते. करोनाकाळात निर्बंधांमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. निर्बंध शिथिल होताच प्रवासी संख्या वाढत गेली. त्यामुळे लोकल गाड्यांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली. या गर्दीचा फायदा घेत फलाट, पादचारी पूल आणि लोकल गाड्यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले. चोरांनी प्रवाशांचे मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असलेल्या बॅगांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. तर गर्दी नसलेल्या ठिकामी महिलांची छेडछाड, विनयंभगाबरोबरच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्याही घटना घडू लागल्या आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण १४ हजार ३३४ गुन्हे घडले आहेत. २०२१ मध्ये यापैकी सहा हजार ७१९ गुन्हे घडले असून २०२२ मध्ये गुन्ह्यांची संख्या सात हजार ६१९ इतकी आहे. तर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी असून २०२१ पासून आतापर्यंत पाच हजार ८८० गुन्ह्यांचा यशस्वीरित्या तपास करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. यापैकी २०२२ मध्ये दोन हजार ७८५ गुन्हे उघड झाल्याची माहिती देण्यात आली. २०२१ आणि २०२२ मध्ये रेल्वेवरच सर्वाधिक गुन्हे घडले असून त्यांची एकूण संख्या नऊ हजार २२२ इतकी आहे. तर पश्चिम रेल्वे उपनगरीय हद्दीत पाच हजार ११२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

आरोपींचीही धरपकड
दोन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर २०२१ पासून १४ हजार ३३४ गुन्हे घडले आहेत. यापैकी पाच हजार ८८० गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले. तर सहा हजार २३९ आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी मध्य रेल्वेवर तीन हजार ७४७ आणि पश्चिम रेल्वेवर दोन हजार ४९२ आरोपींना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१३६ गुन्हेगार तडीपार
विविध गुन्ह्यात अटक केलेले आणि त्यानंतर शिक्षा भोगूनही वारंवार गुन्हे करणाऱ्या १३६ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. चोरी, तसेच लोकल प्रवासात फटका मारुन चोरी करणे अशा गुन्ह्यांत अटक केलेल्या आणि शिक्षा भोगून झालेल्यानंतरही वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना तडीपार करण्यात येते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या