लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कमी जास्त प्रमाणातील पाऊस, ढगाळ हवामान यांमुळे सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूच्या डासांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी मागील आठवड्यात मुंबईत हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जून, जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

अधूनमधून पडणारा पाऊस, वाढता उकाडा अशा सतत बदलत्या वातावरणामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचते आहे. त्यामुळे डेंग्यू व हिवतापासाठी कारणीभूत असलेल्या एडीस आणि ॲनोफेलिस या डासाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. परिणामी मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसते आहे. मुंबई महानरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या पावसाळीजन्य आजारांच्या अहवालानुसार १८ सप्टेंबरला हिवतापाचे ७५६ तर डेंग्यूचे ७०३ रुग्ण सापडले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमधील रुग्णांची संख्या अधिक आहे. हिवतापाचे जूनमध्ये ६७६, जुलैमध्ये ७२१, ऑगस्टमध्ये १०८० रुग्ण सापडले. तसेच डेंग्यूचे जूनमध्ये ३५३, जुलैमध्ये ६८५, ऑगस्टमध्ये ९९९ रुग्ण सापडले होते. हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी लेप्टो, हेपेटायटिस, चिकुनगुन्या, स्वाईन फ्लू या साथीच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

आणखी वाचा-गळा दाबला, वीजेचा शॉक दिला अन्…; मुंबईत नोकराचा मालकीणीवर जीवघेणा हल्ला

पावसाळीजन्य आजारांना आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन ४९ लाख ७८ हजार ७५० घरांचे सर्वेक्षण केले. त्यातून ८३ हजार ३४२ व्यक्तींच्या रक्ताचे नमूने घेतले. तर २३ कार्यालयांच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण केले. तसेच मलेरियाच्या वाढीसाठी कारणीभूत असलेल्या ॲनोफेलिस डासाच्या उत्पत्तीची १२७० तर डेंग्यूच्या वाढीसाठी कारणीभूत असलेल्या एडीस डासाच्या उत्पत्तीची ९९७६ ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.

गॅस्ट्रोच्या संख्येत घट पण…

मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असली तरी १८ सप्टेंबरपर्यंत ३२२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गॅस्ट्रोचा धोका कमी हाेत असला तरी काळजी घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader