|| शैलजा तिवले

सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण; करोनासारख्या लक्षणांमुळे भीती अधिक

मुंबई : सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अशक्तपणा अशी करोनासदृश्य लक्षणे असलेल्या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना अन्य विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळत आहे. श्वसनाशी संबंधित ‘रेस्परेटरी सेन्सिशिअल व्हायरस’ (आरएसव्ही) या विषाणूमुळे बाधित झालेल्यांचे प्रमाण वाढल्याचे निदान तज्ज्ञांनी केले आहे.

गेले काही दिवस ऊन, पाऊस आणि कमी झालेले तापमान असे मिश्र वातावरण असल्यामुळे अन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव तुलनेने वाढला आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या आम्ही प्रथम करोना चाचण्या करतो. परंतु सुमारे ८० टक्के रुग्णांमध्ये करोनाचा संसर्ग नसल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये अन्य विषाणूजन्य आजारामुळे ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळत असल्याची माहिती संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आणि करोना कृती दलाचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली.

 चाचणी आवश्यक…

  रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे करोनाच्या लक्षणांसारखीच आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. परंतु सर्वात आधी करोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपचारांची दिशा ठरविता येते. पण रुग्णांनी करोनासारखी लक्षणे दिसली तरी लगेच घाबरू नये. आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.

प्रौढांमध्ये ‘आरएसव्ही’चे प्रमाण अधिक

आरएसव्हीबाधित रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसत असून हा आजार सामान्यपणे बालकांमध्ये आढळतो. परंतु यावर्षी मोठ्यांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढलेले आढळत आहे. करोनाच्या आधी प्रौढांमध्ये आरएसव्हीची बाधा होण्याचे प्रमाण सुमारे अडीच ते पाच टक्के होते. यावर्षी हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत गेले आहे, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. हरीश चाफळे यांनी सांगितले. करोनाबाधित झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे प्रौढांमध्ये या विषाणूची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

चिंता नको…

आरएसव्हीचे प्रमाण वाढले असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण अन्य विषाणूजन्य आजारांप्रमाणेच लक्षणांनुसार यावर उपचार केले जातात. तसेच हा आजार सर्वसामान्यपणे वातावरणात बदल झाले की आढळतो. अन्य विषाणूजन्य आजारांच्या चाचण्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे चाचण्या करण्यावर फारसा भर दिला जात नाही. लक्षणांनुसार उपचार केल्यास हा आजार चार ते पाच दिवसांत बरा होतो, असे डॉ. नागवेकर यांनी स्पष्ट केले.

पालिका रुग्णालयातही गेल्या काही दिवसांमध्ये अन्य विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. आरएसव्हीच्या चाचण्या महाग असल्यामुळे आपल्याकडे केल्या जात नाहीत. परंतु हादेखील अन्य विषाणूजन्य आजारांप्रमाणेच आहे. त्यामुळे या रुग्णांना लक्षणांनुसार उपचार दिले जातात, असे कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीलिमा रेडकर यांनी सांगितले.

करोना विषाणू कमकुवत

गेल्या महिनाभरापासून आपल्याकडे अन्य विषाणूजन्य आजार आणि आरएसव्हीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सध्या आढळणाऱ्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये करोनाऐवजी याचेच प्रमाण अधिक आहे. महासाथीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेला आजार अन्य आजारांना डोके वर काढू देत नाही. वातावरणीय बदलामुळे या आजारांचे प्रमाण यावर्षी पुन्हा वाढताना दिसत आहे, याचा अर्थ करोना विषाणू काही प्रमाणात कमकुवत झाला असल्याचा निष्कर्ष काढता येईल, असे मत राज्याचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

तुम्हाला नक्की काय होतेय?

‘आरएसव्ही’ हा श्वसन प्रक्रियेशी संबंधित आजार असून रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण, दमा किंवा अन्य श्वसनासंबधी आजार असलेल्या रुग्णांना होण्याचा धोका अधिक असतो. खूप शिंका येणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, डोळे लाल होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. सध्या याचे प्रमाण वाढल्याने आपल्याला करोना झाल्याची भीती अनेक नागरिकांमध्ये आहे.

प्रदूषणाचीही भर…

 नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर दिवाळीत वायू प्रदूषणाची आकडेवारी प्रकाशित केली. या आकडेवारीत दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे प्रदूषित श्रेणीत कल्याण, नवी मुंबई तर साधारण प्रदूषित श्रेणीत चंद्रपूर, मुंबई, पुणे, सोलापूर आणि औरंगाबाद शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वायू प्रदूषणात तुलनेने १३ ते ५० टक्क्यांची वाढ दिसून आली.

हवामानात पुन्हा बदल…

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होणार आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा काही दिवस ढगाळ वातावरण होऊ शकते.