दैनंदिन रुग्णसंख्या वाढू लागल्याचा परिणाम; २० दिवसांत एक हजाराची भर

मुंबई : मुंबईत ऑगस्टच्या मध्यापासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली असून दररोज चारशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे साहजिकच उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ऑगस्टमध्ये अडीच हजारांपर्यंत खाली गेलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून गेल्या वीस दिवसांत त्यात एक हजाराने वाढ झाली आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे दररोज जितके  रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यापेक्षा जास्त रुग्ण नव्याने आढळू लागले आहेत. तसेच नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या निकट संपर्कातील नागरिकही बाधित असल्याचे आढळू लागले आहे. त्यामुळे मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढू लागली की त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग आणि रुग्णांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढत जातो. मुंबईत सध्या अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेचा पश्चिम भाग, कांदिवली, बोरिवली, वांद्रे, खार, सांताक्रुजचा पश्चिम भाग, वडाळा, नायगाव येथे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.

मुंबईत १७ ऑगस्टनंतर करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. गेल्या वीस दिवसांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र काही ठरावीक विभागांमध्ये ही वाढ जास्त आहे. दादर, माहीम, धारावीचा भाग असलेल्या जी उत्तर भागात ही संख्या ८२ वरून २३६ झाली आहे. यामध्ये धारावीतील रुग्णसंख्या कमी असली तरी दादर व माहीममध्ये रुग्ण वाढत आहेत. मुंबईत सध्या रुग्णवाढीत भायखळ्याचा समावेश असलेला ई विभाग प्रथम क्रमांकावर आहे. या भागातही उपचाराधीन रुग्णांची संख्या ६७ पर्यंत खाली गेली होती. ती आता वाढून १७१ झाली आहे. तर परळ, वरळी, वांद्रे, दहिसर या ठिकाणी १०० पेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण होते. तेथील रुग्णसंख्या आता दीडशेच्या आसपास आहे.

सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण कुठे?

  • अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम (के   पश्चिम) :    २७३
  • वडाळा, नायगाव (एफ उत्तर): २२६
  • कांदिवली (आर दक्षिण):   २१०
  • वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम (वांद्रे पश्चिम):  २१०
  • बोरिवली (आर मध्य):  २०५