मुंबई : एप्रिलच्या अखेरपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीसाठे आटू लागले असून राज्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये आठवडाभरात सुमारे १०० गावांची भर पडली असून ७० टँकर्स वाढले आहेत. सध्या राज्यात २१३ गावे आणि ५६३ वाडय़ांना १८७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
यंदा उन्हाळय़ाच्या झळा जास्त बसत असल्याने विजेबरोबरच पाण्याचा वापरही वाढला असून पाणीसाठे आटू लागले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात नाममात्र ३४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र महिनाभरात ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली असून महिनाभारत जवळपास १५० टँकरची भर पडली आहे. सर्वाधिक ७५ टँकर कोकण विभागात सुरू असून ठाणे जिल्ह्यात २६ सुरू झाले आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात ४६ टँकर्स सुरू आहेत. पुणे विभागात २९, मराठवाडय़ात १३, अमरावती विभागात २४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर नागपूर विभागात एकही टँकरची अजून तरी गरज लागलेली नाही. राज्यात सर्वाधिक २७ टँकर्स पुणे जिल्ह्यात सुरू झाले आहेत. मागील आठवडय़ात ११८ गावांना ११३ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तर गेल्या वर्षी याच कालावधीत २४१ गावांना २०२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.