मुंबई : विनाकारण मेल, एक्स्प्रेस डब्यातील आपत्कालिन साखळी खेचण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने सहा स्थानकातील फलाटांच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ ९ मेपासून करण्यात येणार असून ती २३ मेपर्यंत लागू असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. या काळात फलाटाच्या तिकीटासाठी १० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकातील फलाटांच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. आधी १० रुपये असलेले तिकीट दर आता ५० रुपये करण्यात आले आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार रेल्वे स्थानकात येतात.
फलाट तिकीट काढणाऱ्यांनाच फलाटावर प्रवेश दिला जातो. अनेक जण फलाट तिकीट घेऊन स्थानकात जातात. त्यामुळे स्थानकात एकच गर्दी होते. प्रवाशाबरोबरच मित्रपरिवार किंवा नातेवाईक मेल, एक्स्प्रेसच्या डब्यात प्रवेश करून विनाकारण किंवा किरकोळ कारणांसाठी आपत्कालिन साखळी खेचत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
सध्या गर्दीचा काळ आहे. नियमित गाडय़ांबरोबरच मोठय़ा प्रमाणात उन्हाळी विशेष गाडय़ाही सोडण्यात येत आहेत. प्रवासीही स्थानकात वेळेत पोहोचावे, घाई तसेच गोंधळ होऊ नये, फलाटावरील गर्दी टाळता यावी आणि विनाकारण साखळी खेचण्याच्या घटनांना आळा बसावा यासाठी फलाट तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
साखळी खेचण्याच्या ३३२ घटना
एप्रिल महिन्यात आपत्कालिन साखळी खेचण्याच्या ३३२ घटना घडल्या असून यापैकी २७९ प्रकरणांत विनाकारण साखळी खेचण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये १८८ जणांवर केलेल्या कारवाईतून ९४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मेल, एक्स्प्रेस सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी प्रवाशांनी स्थानकात पोहोचावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.