scorecardresearch

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यातही वाढ

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात १ एप्रिलपासून सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

IPO Market 2021 Fundraising hits record Rs 1 lakh crore mark as 63 issues hit Street

मुंबई : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात १ एप्रिलपासून सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात कार्यरत अधिकार व कर्मचाऱ्यांना ५ हजार ४०० रुपये व इतर ठिकाणी २ हजार ७०० रुपये इतका वाहतूक भत्ता मिळणार आहे. वेतनश्रेणीप्रमाणे वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. तसेच बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहातील कार्यरत अंध, अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या तसेच मूकबधिर, श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना १० हजार ८०० रुपये व इतर ठिकाणी ५ हजार ४०० रुपये वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

राज्यातील शासकीय सेवेतील ४० ते ५० वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन वर्षांतून एकदा आणि ५१ वर्षांपुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर वर्षांला वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर महागाई भत्तावाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे दोन्ही निर्णय घेण्यात आले. 

वैद्यकीय संचालक, अध्यापकांना भत्ते

राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापक, तसेच अधिष्ठाता, सह संचालक व संचालक या संवर्गाना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयानुसार व्यवसायरोध भत्ता, पदव्युत्तर भत्ता, विशेष भत्ता, अतिरिक्त वेतनवाढी व करिअर एडव्हान्समेंट स्कीम भत्ते सुधारित दराने लागू करण्यात येतील.

कला शिक्षकांना विविध लाभ

राज्यातील कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ कला संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय, त्रिस्तरीय वेतन संरचना, अध्यापकांनी विनाअनुदानित कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण, शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांपर्यंत प्रसुती रजा आदी लाभ देण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase transport allowance government employees employees cabinet meeting recognition ysh

ताज्या बातम्या