मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशक्षमतेत २०२१-२२ शैक्षणिक वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी सांगितले. मुंबईतील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय व नायर चॅरीटेबल रुग्णालयात डी.एम. (नेफ्रॉलॉजी) या विषयासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता १ वरून ३ करण्यात आली आहे. तर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. (अँनेस्थिओलॉजी) या विषयात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता ४ असणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम.डी. (जनरल मेडिसीन) आणि एम.एस. (जनरल सर्जरी) या दोन विषयांतील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे ३ वरून ६ आणि ३ वरून ५ इतकी वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (मायक्रोबायॉलॉजी), (पँथॉलॉजी), (फार्माकॉलॉजी), (रेस्पिरेटरी मेडिसिन) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ३, ४, ३ आणि २ इतकी विद्याथी प्रवेशक्षमता नव्याने करण्यात आली आहे. याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डीच्या सात विषयांसाठी विद्याथी प्रवेशक्षमतेत वाढ करण्यात आली आहे.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरचे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविदयालय, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील एमडीच्या विविध विषयांमधील जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे.