मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ५९ वयोगटासाठी सुरू झालेल्या करोना प्रतिबंधात्मक लशीच्या वर्धक मात्रेच्या लसीकरणाला मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्येच मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असून राज्यात ६ हजार ४७८ जणांनी ही लस घेतली आहे. ग्रामीण भागात किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात १९ जिल्ह्यांमध्ये शून्य लसीकरण झाले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील लसीकरण शहरापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते. केंद्रीय आरोग्य विभागाने १० एप्रिलपासून १८ ते ५९ वयोगटासाठी वर्धक मात्रेचे सशुल्क लसीकरण सुरू केले आहे. सध्या खासगी रुग्णालयातच वर्धक मात्रेच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध असून दोन दिवसांमध्ये राज्यात ६,४७८ जणांनी वर्धक मात्रा घेतली. यामध्ये राज्यात सर्वाधिक म्हणजे ३,१६३ नागरिक मुंबईतील आहेत. त्यानंतर पुण्यात १,४२०, ठाण्यात १,३४४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यानंतर थेट रायगडमध्ये १८७ तर नागपूरमध्ये १४३ जणांनी वर्धक मात्रा देण्यात आली.

 पालघरमध्ये ९७, कोल्हापूरमध्ये २८ आणि जळगावमध्ये १४ जणांनी ही लस मिळाली आहे. सोलापूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तर केवळ सात नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. गावागावांमध्ये लसीकरण पोहचण्याच्या उद्देशातून लसीकरणाचे विकेंद्रीकरण करत असल्याचे केंद्राने धोरणात नमूद केले होते. परंतु राज्यभरात वर्धक मात्रेचे लसीकरण खुले केले तरी लसीकरण करणारी खासगी रुग्णालये शहरांमध्येच केंद्रित असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये या मात्रेचे लसीकरण सुरू होऊ शकलेले नाही.

पाचपेक्षाही कमी लसीकरण झालेले जिल्हे

  • नगर
  • सांगली
  • सातारा