फराळाच्या परदेशवारीत अडचणी फार

इंधनदरवाढीमुळे विमान वाहतूक सेवाही महागली आहे

दरवाढ, विमानांच्या मर्यादित फेऱ्या आणि कुरिअरच्या वाढीव शुल्काचा फटका

मुंबई : करोना संसर्गामुळे विमान फेऱ्यांवर आलेली मर्यादा, इंधन दरवाढ, घरपोच सेवा शुल्कात झालेली वाढ आदी विविध कारणांमुळे परदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, परदेशस्थ भारतीयांना यंदा दिवाळीचा फराळ विलंबाने मिळण्याची चिन्हे आहेत.

शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशात राहणारे किंवा स्थायिक झालेली भारतीय मंडळी तेथे आपले सणउत्सव साजरे करीत असतात. फरळाशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात फराळ पाठवला जातो. यंदा मात्र फराळाच्या परदेशवारीत अडचणी आल्या आहेत.

करोनामुळे मालवाहतूक करणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या दर आठवड्याला सिंगापूरला दोन, दुबईला दोन आणि अमेरिकेत चार इतकीच विमाने जात असल्याची माहिती एका कुरियर कंपनीतील अधिकाऱ्याने दिली. ‘ दिवाळीचा हंगाम असल्याने कुरियर यंत्रणेवर मोठा ताण आहे. परिणामी फराळ पोहोचायला दिरंगाई होते आहे. अमेरिका, युरोप, दुबई अशा महत्त्वाच्या देशांत फराळ पोहोचायला आठ ते दहा दिवस लागत आहेत,’ असेही ते म्हणाले.

इंधनदरवाढीमुळे विमान वाहतूक सेवाही महागली आहे. परिणामी, कुरियर कंपन्यांनी आपल्या शुल्कात २० ते २५ टक्के वाढ केली आहे. पूर्वी अमेरिकेत एक किलो फराळ पोहोचविण्यासाठी एक हजार रुपये लागायचे. आता १२०० ते १३०० रुपये मोजावे लागत आहेत, अशी माहिती फराळ उद्योजकांनी दिली. 

कुरियर सेवेला विशेष महत्त्व

या वर्षी जवळपास ५६ देशांत आम्ही फराळ पाठवला. करोनामुळे विमान सेवा काहीशी विस्कळीत झाल्याने परदेशी फराळ पाठवताना अनेक अडचणी येत आहेत. परंतु काही नामांकित कंपन्यामुळे तो वेळेत पोहोचवणे शक्य झाले. एका कंपनीने विशेष विमानाद्वारे आमचा फराळ २४ तासात युरोप आणि अमेरिकेत पोहोचवला. त्यामुळे फराळ पोहोचविण्यामागे कुरियर सेवांचे महत्त्व विशेष आहे. यंदा कुरियर सेवांचे दर वाढले असले तरी त्याचा भार आम्ही ग्राहकांवर पडू दिला नाही. सध्याची आर्थिक स्थिती समजून घेऊन आम्ही गेल्या वर्षीचे दर आकारले आहेत, अशी माहिती गोडबोले स्टोअर्सचे सचिन गोडबोले यांनी दिली.

१५ दिवसांपूर्वी पाठवलेला फराळ वेळेत पोहोचला. परंतु आता दिवाळी तोंडावर आल्याने कुरियर यंत्रणेवर ताण आला असून विमानसेवा अपुरी पडत आहे. परिणामी, आता फराळ पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत आहे. शिवाय विमान सेवा शुल्कात २० ते २५ टक्के दरवाढ झाल्याने कुरियरचे दरही वाढले आहेत. – राजू पटेल, पाळंदे कुरियर  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increased fares limited air fares and increased courier charges akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या