मुंबई : मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक भागांत हिवतापाचा प्रदुर्भाव सुरू झाला असून जूनच्या पहिल्या पाच दिवसांतच ५७ रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात प्रसार वाढण्याची शक्यता आहे.हिवताप निर्मूलनाची मोहीम शहरात २०१७ पासून सुरू झाली. त्यानंतर रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण यात घट झाली. परंतु करोना काळात हिवताप नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्याने या काळात हिवतापाचा प्रसार वाढला. शहरात २०२० मध्ये हिवतापाचे ५००७ रुग्ण, २०२१ मध्ये ५१७२ रुग्ण आढळले. जानेवारी ते मे या कालावधीतही शहरात हिवतापाचा प्रसार सुरूच होता. या पाच महिन्यांच्या काळात शहरात ९५० रुग्णांची नोंद झाली आहे. मे महिन्यात मुंबईत २३४ रुग्ण आढळले होते.

जूनच्या पहिल्या आठवडय़ातच हिवतापाच्या प्रसारात काही प्रमाणात वाढ झाली असून ५७ रुग्णांची भर पडली आहे. प्रभादेवी आणि भायखळय़ा जास्त रुग्ण जूनमध्ये प्रभादेवी आणि भायखळा या भागात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही वर्षांत या दोन्ही भागांमध्ये हिवतापाचा प्रसार जास्त असल्याचे आढळले आहे. पालिकेने नुकत्याच तयार केलेल्या हिवताप नियंत्रण कृती आराखडय़ामध्ये या दोन्ही विभागांसह शहरातील हिवतापाचे रुग्ण जास्त आढळणाऱ्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रतिबंधासह रुग्णांच्या चाचण्या, घरोघरी सर्वेक्षण याबाबींवर भर देण्यात येणार आहे.

आमच्या भागात बीडीडी चाळ, बांधकामाची ठिकाणे, पाणी साचणाऱ्या मोकळय़ा जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात हिवतापाचा प्रादुर्भाव आढळतो. यादृष्टीने सर्व भागांची पाहणी सुरू केली आहे, अशी माहिती भायखळय़ातील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्यामध्ये हिवतापाच्या डासांची वाढ होण्याचा धोका आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हिवतापाचा प्रसार आणखी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. मच्छरदाणीचा वापर करावा. घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच पत्र्याचे रिकामे डबे, थर्माकॉलचे खोके, करवंटय़ा, गाडीची चाके आदी पाणी साचू शकेल वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हिवतापाबरोबरच डेंग्यू आणि लेप्टोचाही प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. जूनच्या पाच दिवसांत शहरात १० रुग्ण आढळले आहेत, तर लेप्टोच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे.