देशातील प्रमुख बंदरातील व गोदीतील सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनात १ जानेवारी २०१२ पासून ५.६९ टक्के वाढ देण्याचा निर्णय केंद्रीय नौकानयन आणि परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार कामगारांना तीन वर्षांची थकबाकीही मिळणार असून त्याचा देशातील सव्वा लाख निवृत्त कामगारांना फायदा होणार आहे, अशी माहिती ‘ऑल इंडिया पोर्ट ट्रस्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन’चे सरचिटणीस सुधाकर अपराज यांनी दिली.

मान्यताप्राप्त बंदर आणि गोदी कामगारांच्या संघटना यांच्यात ऑक्टोबर २०१३ मध्ये वेतन करार झाला होता. त्यानुसार सध्या सेवेत असणाऱ्या कामगारांना १ जानेवारी २०१२ पासून मूळ वेतनावर १०.५ टक्के वाढ देण्यात आली. या कामगारांना वेतनवाढीतील फरकाची रक्कमही मिळाली. त्याचबरोबर निवृत्त कामगारांच्याही निवृत्तिवेतनात वाढ मिळावी, अशी संघटनांची मागणी होती. ती केंद्रीय नौकानयन व परिवहन मंत्रालयाने मान्य केली व ७ जुलैला तसा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आता सर्व निवृत्त कामगारांना १ जानेवारी २०१२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने निवृत्तिवेतनात ५.६९ टक्के वाढ देण्यात येणार आहे, असे फेडरेशनचे सचिव मारुती विश्वासराव यांनी सांगितले.