मुंबई : मैदानावर भारताशी दोन हात न करण्याचा डाव उधळला गेल्यानंतर पाकिस्तानने रविवारी कोलंबोत प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय सपशेल लोटांगण घातले. भारताची ‘फिरकी’ घेण्याची वल्गना करणारे पाकिस्तानी खेळाडू प्रत्यक्षात भारतीय फलंदाजांना रोखू शकले नाहीत आणि नंतर गोलंदाजांसमोर नांगी टाकून एकापाठोपाठ एक तंबूत परतले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या (७७) अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १७५ धावसंख्या उभारली. मात्र, आव्हानाचा पाठलाग करणार्या पाकिस्तानचा संघ १९ षटकांत ११४ धावांवर आटोपला. केवळ उस्मान खानने (४४) थोडाफार प्रतिकार केला.
फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर वर्चस्व राखण्याचे पाकिस्तानचे स्वप्न रविवारी धुळीस मिळाले. भारतीयांना आव्हान देण्यासाठी पाकिस्तानकडून उपलब्ध असलेल्या सर्व फिरकी गोलंदाजांचे पर्याय वापरण्यात आले. डावातील २० पैकी १८ षटके पाकिस्तानने फिरकी गोलंदाजीचा मारा केला.
इशान किशनने गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केल्यावर पाकिस्तानी गोलंदाजी गडबडून गेली. सहाजिकच गोलंदाज बळी मिळविण्याचे विसरुन धावा रोखण्याकडे लक्ष देऊ लागले. पण, या प्रयत्नांत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनी मधल्या षटकांत भारताचा धावफलक हलता ठेवला होता आणि तोच निर्णायक ठरला.
पाकिस्तानला आव्हानाचा पाठलाग करणे कधीच जमले नाही. भारताच्या आव्हानाचे दडपण त्यांच्यावर इतके होते की त्यांनी पहिले षटक निर्धाव खेळून काढले. त्यानंतर दुसर्या षटकापासून पाकिस्तानचा डाव गडगडण्यास सुरुवात झाली. – सविस्तर क्रीडा
हस्तांदोलन नाहीच
’आशिया चषक क्रिकेट स्पर्धेपासून भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार देण्याची परंपरा या लढतीतही कायम राहिली.
’नाणेफेकीसाठी दोन्ही
कर्णधार मैदानावर आले, तेव्हा
ते अंतर राखूनच उभे होते. त्यामुळे हस्तांदोलन होणार नाही हे स्पष्ट झाले.
