मुंबई: एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. जेणेकरुन एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी एसटीतील १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने बेमुदत संप करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. लवकरच संपाची तारीख जाहीर के ली जाईल, अशी माहिती मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

करोनामुळे एसटीचे प्रवासी दुरावले आणि उत्पन्नही कमी झाले. परिणामी राज्यातील लाखभर एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर मिळणे बंद झाले. त्यामुळे वेतनासाठी राज्य सरकारकडूनच आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. या मुद्दयांसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एसटीतील मान्यताप्राप्त कामगार संघटनांसह बैठक झाली. यावेळी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या ताब्यात द्यावे, या महत्त्वाच्या मागणीसाठी लवकरच बेमुदत संप पुकारण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.