एमएमआरडीएकडून व्यवहार्यता अभ्यास सुरू

मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पात (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) मेट्रो मार्ग प्रस्तावित असून आता सागरी मार्गाला मेट्रोसह स्वतंत्र बसमार्गिकेचीही जोड मिळणार आहे. पारबंदर प्रकल्पावर स्वतंत्र बसमार्गिका उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला असून मेट्रो मार्ग आणि स्वतंत्र बसमार्गिकेच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ २५ मिनिटांत पार करता यावे यासाठी शिवडी-नाव्हाशेवा सागरीसेतू प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. १७,८४३ कोटी खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूच्या कामाला मार्च २०१८ मध्ये सुरुवात झाली. हे काम ५४ महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे रखडलेला हा प्रकल्प आता २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता या प्रकल्पाला मेट्रो मार्गिका आणि स्वतंत्र बसमार्गिकेची जोड मिळणार आहे. एमएमआरडीएने मुंबई पारबंदर प्रकल्पात याआधीच नवी मुंबई विमानतळ ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. एमएमआरडीए सध्या या मेट्रो मार्गिकेचा व्यवहार्यता अभ्यास करीत आहे. हा अभ्यास झाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मेट्रो मार्गिका बांधण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

सर्वसामान्यांना फायदा

सागरी सेतूमधून मेट्रो मार्ग जाणार असून एका बाजूला स्वतंत्र बसमार्गिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात करण्यात आल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले. सहा मार्गिकेच्या सागरी सेतूवरील दोन बाजूच्या एका मार्गिकेवर स्वतंत्र बसमार्गिका बांधण्याचा प्रस्ताव असून या मार्गिकेवर इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश नसेल. स्वतंत्र बस मार्गिका प्रत्यक्षात झाली तर संपूर्ण मार्गावर चार ते पाच मिनिटांच्या अंतराने बस धावतील. भविष्यात सागरी सेतूवर मेट्रो आणि बेस्ट, इतर बस सेवा कार्यान्वित झाली तर या मार्गाचा फायदा सर्वसामान्यांनाही होणार आहे.