मुंबई : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजूर केलेल्या ‘स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळा’ची रचना व आर्थिक तरतुदीबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यरत करू, असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक, ठाणे येथील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री फुंडकर यांची मुंबईत भेट घेतली, त्या वेळी फुंडकर यांनी हे आश्वासन दिले.

शिष्ठमंडळात राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर (वर्धा), कार्याध्यक्ष बालाजी पवार (नांदेड), सरचिटणीस विकास सूर्यवंशी (सांगली), कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार (बुलढाणा) व व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे (ठाणे) यांचा सहभाग होता. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र अद्याप पुढील कारवाई झालेली नाही. याबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने केळकर यांच्या समवेत कामगार मंत्री फुंडकर यांची भेट घेतली.

फुंडकर यांनी या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांचा व्यवसाय, एकूण कामाची पद्धत याबाबत सविस्तर चर्चा केली. इतर महामंडळांबाबत येत असलेल्या अडचणी व त्यांचा विचार करून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी असणाऱ्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाच्या रचनेचे काम सुरू असल्याचे सांगितले. लवकरच वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ कार्यरत होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

काय आहेत मागण्या?

वृत्तपत्र विक्रेता हा दुर्लक्षित घटक असून अनेक अडचणींवर मात करत व्यवसाय करत आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर कार्यरत करावे. या मंडळासाठी लागणारा निधी उभा करण्याचे मार्ग राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने सुचवलेले आहेत. २०१९ मध्ये या अभ्यास समितीने आपला अहवाल राज्य शासनास दिला असून, त्यातील सुचवलेल्या मार्गापैकी काही मार्गांचा अवलंब करून निधीचा स्त्रोत नक्की करावा. त्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी पेन्शन, व्यवसायासाठी मदत, व्यवसायासाठी साधनसामग्रीची पुरवठा, आरोग्य सुविधा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना आदी योजना लागू कराव्यात अशी विनंती आमदार केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने कामगार मंत्र्यांना केली.