मुंबई : गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची, अशी घोषणा पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केली. हा अधिकारी पोलीस निरीक्षक दर्जाचा असून तो गृहनिर्माण संस्थांच्या समस्या पाहणार असल्याचे पांडे यांनी समाजमाध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

मुंबईत स्थापन करण्यात येणाऱ्या सिटीझन फोरमच्या प्रमुखाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी पांडे यांनी स्पष्ट केले. पोलीस ठाण्यांमधील जनसंपर्क विभागाच्या पोलीस निरीक्षकांना गृहनिर्माण संस्थांच्या समस्याबाबतची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलीस निरीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

गृहनिर्माण संस्थांमधील अडचणी सोडवण्यात संबंधित अधिकारी मदत करणार आहेत. पंतनगर येथील गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशांनी पोलीस ठाण्याला संस्थेच्या अध्यक्षाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीबाबत बोलताना संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. या सिटीझन फोरमची पहिली बैठक १८ मे रोजी होणार आहे. या फोरममध्ये पदाधिकारी होण्यासाठी २०० हून अधिक जणांनी अर्ज केले आहेत. या फोरमचे १२ विभाग आहेत. याशिवाय ५ उपविभाग असतील. सिटीझन फोरमचे एक संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मुंबईकरांनी हे संकेतस्थळ बनवल्याचे संजय पांडे यांनी सांगितले.

१२ हजारापेक्षा अधिक कारवाया 

गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याबद्दल १२ हजार ३९० गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय मुंबईतील रस्त्यांवरून १३ हजार ४३० बेवारस वाहने हटवण्यात आली आहेत. तसेच गेल्या आठवडय़ात १८ कारवायांमध्ये ८० लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त आला आहे. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या ४ हजार २१४ जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत, संजय पांडे यांनी याबाबतची माहिती समाजमाध्यमांवर दिली.