मुंबई : मरणोत्तर दान करण्यात येणारे अवयव शास्त्रीय पद्धतीने शरीरापासून विलग करण्यासाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे. या शस्त्रक्रियागृहात याबाबत डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच अशा शस्त्रक्रियागृहाची रचना करण्यात आली आहे.
विभागीय आणि राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण समितीच्या (रोटो-सोटो) माध्यमातून साकारण्यात आलेल्या शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन मंगळवारी केईएममध्ये पार पडले. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉ. अनिल कुमार, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. करोनाकाळानंतर मरणोत्तर अवयवदान मोहीम पुन्हा वेग घेत आहे.
मरणोत्तर अवयवदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ‘रोटो-सोटो’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दान केलेले अवयव योग्यरितीने विलग कसे करावेत याचे प्रशिक्षण देण्याची अधिक आवश्यकता आहे. यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाची आवश्यकता होती. यासाठी या शस्त्रक्रियागृहाची निर्मिती केली आहे. येथे प्रत्यक्ष अवयव विलग करण्याची सुविधा आहे, याव्यतिरिक्त डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून प्रशिक्षणासाठी आवश्यक मृतदेहाचे १४ अंश सेल्सिअसखाली जतन करण्यासाठी केईएमध्ये शवशीतगृहाची रचनाही गेल्या महिन्यात करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाली असून लवकरच डॉक्टरांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल, असे ‘रोटो-सोटो’च्या संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले. केईएमध्ये सुरू झालेल्या या शस्त्रक्रियागृहाच्या माध्यमातून अवयदान दोन मोहिमेला बळ मिळणार आहे. शिवाय यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केलेल्या डॉक्टरांची संख्याही वाढण्यास मदत होईल. शासकीय रुग्णालयांमध्येही स्वतंत्र सुविधा आणि अवयव दान-प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे हे कौतुकास्पद आहे. करोनाकाळातही राज्याने अवयवदानाच्या मोहिमेमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
अवयवदानाच्या प्रक्रियेत नातेवाईकांचे समुपदेशन करणे हेही महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या प्रशिक्षणामध्ये याचाही समावेश करावा, असे डॉ. अनिल कुमार यांनी यावेळी सूचित केले. शासकीय रुग्णालयांमध्ये अवयवदानाचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. अवयवदानासाठी प्रतिज्ञापत्र करण्याकरिता उत्सुक असलेल्यांसाठी बाह्यरुग्ण विभागामध्ये सेवा उपलब्ध केल्यास हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, असे मत काकाणी यांनी व्यक्त केले.
१६ ते १८ एप्रिलला प्रशिक्षण
मरणोत्तर अवयवदानाचे पहिले प्रशिक्षण या शस्त्रक्रियागृहामध्ये १६ ते १८ एप्रिल या काळात आयोजित केले आहे. हृदय, फुप्फुसे, मूत्रिपड, यकृत, छोटे आतडे, स्वादुपिंड, हाडे विलग करण्याचे प्रशिक्षण यात दिले जाणार आहे.
हाडांचे दानही शक्य
शस्त्रक्रियागृहाबाबत विशेष केईएममध्ये सुरू केलेल्या या शस्त्रक्रियागृहामध्ये शरीराचे अवयव, ऊती, हृदयातील झडपा, त्वचा इत्यादी भाग शरीरापासून विलग करता येणार आहेत. शल्यचिकित्सकांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी याचा वापर करता येईल. केईएममध्ये सध्या मरणोत्तर अवयवदान केले जात असले तरी या शस्त्रक्रियांमध्ये हाडांचे दान करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसते. हे नवीन शस्त्रक्रियागृह उपलब्ध झाल्यामुळे आता हेदेखील करता येणार आहे.
अवयवदान नोंदणी आणि प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी पालिका क्षेत्रातील डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपणाच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी rottosotto.mumbai@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा ७०२१९३२४४७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच अवयव दानासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनीही याच क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.