मुंबई : भारतामध्ये कर्करोगाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब ठरत असून वयाच्या ७५ वर्षांपूर्वी प्रत्येक दहा भारतीयांपैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था यांच्या ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. बदलती जीवनशैली, तंबाखूचे वाढते सेवन, प्रदूषण, लठ्ठपणा आणि उशिरा होणारे निदान यामुळे देशातील कर्करोगाचे ओझे सातत्याने वाढत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आकडेवारीनुसार भारतात २०२४ मध्ये सुमारे १५.३३ लाख नवीन कर्करोग रुग्णांची नोंद होण्याचा अंदाज आहे. याशिवाय लाखो नागरिक कर्करोगाशी झुंज देत असून, या आजारामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मृत्यूही होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, लोकसंख्येतील वाढ, आयुर्मानात झालेली वाढ आणि बदलती जीवनशैली यामुळे येत्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, पुरुषांमध्ये तोंड, फुफ्फुस, अन्ननलिका आणि पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्लेषणानुसार भारतातील सुमारे ३७ टक्के कर्करोग पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहेत. म्हणजेच दरवर्षी जवळपास ५.२ लाख कर्करोगाची प्रकरणे केवळ तंबाखूपासून दूर राहणे, मद्यसेवन टाळणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम, लसीकरण आणि वेळेवर तपासणी यांसारख्या उपायांनी रोखता येऊ शकतात. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधावर अधिक भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतामध्ये कर्करोगाचे निदान बहुतांश वेळा उशिरा होत असल्याचेही या अहवालातून अधोरेखित झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे किरकोळ वाटल्याने अनेक रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळतात. परिणामी आजार तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचल्यानंतरच निदान होते. त्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे, दीर्घकालीन आणि खर्चिक ठरतात. तोंडातील न भरून येणारी जखम, दीर्घकाळ खोकला, गिळताना त्रास, वजन झपाट्याने कमी होणे, शरीरात गाठ जाणवणे किंवा शौच-मूत्राच्या सवयींमध्ये बदल अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाविरुद्धची सर्वात प्रभावी लढाई म्हणजे जनजागृती आणि लवकर निदान. स्तनाचा, गर्भाशयमुखाचा, तोंडाचा आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगासाठी नियमित तपासणी केल्यास अनेक रुग्णांमध्ये आजार सुरुवातीच्या अवस्थेतच सापडतो आणि उपचारांचे यशही लक्षणीयरीत्या वाढते. तसेच मुलींना एचपीव्ही आणि नागरिकांना हेपॅटायटिस-बी लसीकरणाचा लाभ मिळाल्यास काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात निदान व उपचारांच्या सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत. अनेक रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे परवडणारे उपचार, अधिक कर्करोग तपासणी केंद्रे आणि प्राथमिक स्तरावरच स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडूनही प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात असून तंबाखूमुक्त भारत, नियमित तपासणी आणि जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे की कर्करोग हा केवळ उपचारांचा विषय नसून, तो प्रतिबंध, वेळेवर निदान आणि निरोगी जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम आहे. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास लाखो भारतीयांना या गंभीर आजारापासून वाचविणे शक्य आहे.
