मुंबई : भारतामध्ये प्रथमच तयार करण्यात आलेल्या बाल कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या राष्ट्रीय नोंदणी अभ्यासातून अत्यंत आशादायक चित्र समोर आले आहे. या अभ्यासानुसार बाल कर्करोगावर उपचार घेतलेल्या मुलांपैकी सुमारे ९४.४ टक्के मुले निदानानंतर पाच वर्षांनी जिवंत असल्याचे आढळले आहे. हा महत्त्वपूर्ण अभ्यास ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथ इस्ट एशिया’ या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

इंडियन चाईल्डहुड कॅन्सर सर्व्हायवरशीप (सी२एस) हा अभ्यास २०१६ मध्ये सुरू करण्यात आला होता. मर्यादित संसाधने असलेल्या देशांमध्ये बाल कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांची अशी राष्ट्रीय पातळीवरील नोंदणी करणारा हा जगातील मोजक्या उपक्रमांपैकी एक मानला जात आहे. या संशोधनात एम्स आणि राजीव गांधी कँन्सर इन्स्टिट्यूट अँण्ड रिसर्च सेंटर, नवी दिल्ली येथील तज्ज्ञांसह देशभरातील २० कर्करोग उपचार केंद्रांचा सहभाग होता. अभ्यासात १८ वर्षांखालील वयात कर्करोगाचे निदान झालेल्या आणि उपचारानंतर रोगमुक्त झालेल्या ५,४१९5 मुलांचा समावेश करण्यात आला.

अभ्यासानुसार अक्यूट ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग प्रकार असून तो सुमारे ४०.९ टक्के रुग्णांमध्ये आढळला. उपचारांमध्ये केमोथेरपीचा सर्वाधिक वापर (९४.७ टक्के) करण्यात आला, तर ३० टक्के मुलांवर शस्त्रक्रिया आणि २६.३ टक्के रुग्णांवर रेडिओथेरपी करण्यात आली. संपूर्ण गटामध्ये पाच वर्षांनंतरचे एकूण जगण्याचे प्रमाण ९४.५ टक्के, तर कर्करोग पुन्हा न होणे किंवा गंभीर गुंतागुंत न दिसण्याचे प्रमाण (इव्हेंट-फ्री सर्व्हायव्हल) जवळपास ८९.९ टक्के आढळले.

उपचारानंतर किमान दोन वर्षे नियमित तपासणीत राहिलेल्या २,२६६ मुलांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ९८.२ टक्के आणि ९५.७ टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले.एकूणच कर्करोग तपासणीचे जाळे व्यापक करण्याची गरज असून उपचाराची व्यवस्था ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बालकर्करोग हे एक आव्हान असून त्यावरील उपचारासाठी एकाच ठिकाणी व्यवस्था असलेली रुग्णालये निर्माण होणे गरजेचे आहे.

संशोधकांच्या मते, कर्करोगावर यशस्वी उपचार झाल्यानंतरही काही दुष्परिणाम अनेक वर्षांनी दिसू शकतात. अंदाजे एक-तृतीयांश ते निम्म्या बाल कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात आणि त्यापैकी काही गंभीर स्वरूपाच्या असू शकतात. भारतामधील बाल कर्करोगातून बरे झालेल्या मुलांच्या दीर्घकालीन आरोग्य स्थितीबाबत माहितीची कमतरता लक्षात घेता, हा सी२एस अभ्यास महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. संशोधकांच्या मते, हा राष्ट्रीय डेटाबेस भविष्यातील आरोग्य धोरणे, उपचारानंतरची निगा आणि दीर्घकालीन परिणामांच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.