मुंबई: जुलै महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या १.२० कोटींवर आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४.८० टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनायाच्या (डीजीसीए) आकडेवारीतून समोर आली आहे. पावसाळा आणि विमानांच्या क्षमतेतील व्यवस्थापन यामुळे विमान कंपन्यांच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे.
पहिल्या सात महिन्यांचा विचार करता विमान प्रवासी वाहतुकीत किरकोळ वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै २०२६ दरम्यान, देशांतर्गत विमान कंपन्यांनी ९८४.०३ लाख प्रवाशांची ताहतूक केली. गेल्या वर्षीं याच कालावधीत ही संख्या ९७७.७९ लाख होती. त्यामुळे वार्षिक आधारावर प्रवासी वाहतुकीत ०.६४ टक्यांची वाढ झाली.
इंडिगोचा दबदबा कायम; बाजारहिस्सा ६७.४ टक्क्यांवर
इंडिगोने जुलैमध्ये ८०.८२ लाख प्रवाशांची वाहतूक केली. जूनमध्ये ही संख्या ८९.२० लाख होती. प्रवासी संख्येत घट झाली असली तरी बाजारहिस्सा वाढविण्यात इंडिगोला यश आले. इंडिगोचा बाजारहिस्सा जूनमध्ये ६६.३ टक्के होता, तो जुलैमध्ये ६७.४ टक्क्यांवर पोहोचला. टाटा समूहाच्या एअर इंडियाने जुलैमध्ये २८.७५ लाख प्रवाशांची वाहतूक केली. जूनमध्ये ही संख्या ३२.२२ लाख होती. प्रवासी संख्या कमी झाली असली तरी एअर इंडिया समूहाचा बाजारहिस्सा २३.९ टक्क्यांवरून किंचित वाढून २४ टक्के झाला.
अकासा, स्पाइसजेटच्या प्रवासी संख्येत मोठी घट
अकासा एअरच्या प्रचाशांची संख्या जूनमधील ८.६१ लाखांवरून जुलैमध्ये ६.६५ लाखांवर आली. त्यामुळे कंपनीचा बाजार हिस्साही ६.४ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर घसरला. स्पाइसजेटच्या प्रवासी संख्येतही मोठी घट झाली. जूनमध्ये २.६३ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या स्पाइसजेटने जुलैमध्ये केवळ १.८७ लाख प्रवाशांची वाहतूक केली. कंपनीचा बाजार हिस्सा १.९ टक्क्यांवरून १.६ टक्क्यांवर आला.
विमान वाहतूक सुरक्षा नियामकानुसार, मागील महिन्यात बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, कोचीन, गुवाहाटी आणि लखनौ या १० देशांतर्गत विमानतळांवरून ये-जा करणाऱ्या विमानांपैकी, वेळेवर पोहोचण्याच्या कामगिरीमध्ये इंडिगोची सर्वाधिक टक्केवारी (९१.२ टक्के) होती, त्यानंतर अकासा एअरचा (९०.८ टक्के) क्रमांक लागतो.
विमान कंपन्यानुसार, अकासा एअरने ९१.९ टक्के सर्वाधिक प्रवासी भार गुणक नोंदवला, त्याखालोखाल स्पाईसजेट (८४.१ टक्के), एअर इंडिया ग्रुप (८३.२ टक्के) आणि इंडिगो (८२.४ टक्के) यांचा क्रमांक लागतो. देशांतर्गत विमानसेवांचा एकूण रद्द होण्याचा दर ०.६२ टक्के होता, ज्यामध्ये तांत्रिक कारणांमुळे सर्वाधिक ३९.९ टक्के उड्डाणे रद्द झाली.
त्याखालोखाल परिचालन कारणे (२७.४ टक्के) आणि हवामानाशी संबंधित व्यत्यय (२२.७ टक्के) यांचा क्रमांक लागतो. दरम्यान, विमान कंपन्यांना २,१९६ प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे डीजीसीएच्या आकडेवारीतून निदर्शनास आले. म्हणजेच प्रति १० हजार प्रवाशांमागे सुमारे १.८३ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
