मुंबई : प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या विस्तारित जाळ्यामुळे देशांतर्गत हवाई प्रवासाला मागणी वाढली आहे. देशांतर्गत हवाई प्रवासात २०२६ या आर्थिक वर्षात १.४ टक्क्यांची वाढ झाली असून, या काळात विमानातून १,६७७.४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मार्च २०२६ मधील वाहतुकीतही १ टक्क्याने वाढ झाली.
कोरोनानंतर हवाई प्रवासाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. केंद्र सरकारने राज्यांमध्ये विमानतळ उभारून प्रादेशिक वाहतुकीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिक हवाई प्रवासाकडे जास्त आकर्षित होत आहेत. विमान कंपन्यांनी
२०२६ या आर्थिक वर्षात ८९.५ टक्के इतक्या उच्च भारक्षमतेने (लोड फॅक्टर) प्रवासी वाहतूक केली. मार्च २०२५ मध्ये हे प्रमाण ८६ टक्के होते. सर्व भारतीय विमान कंपन्यांनी २०२५ मध्ये एकूण १ हजार ६५३.८ लाख प्रवाशांना हवाई प्रवास घडवला होता. यंदा यात १.४ टक्यांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यात विमान कंपन्याची क्षमता गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्यांनी कमी असली तरी देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक गेल्या वर्षाच्या तुलनेत १ टक्क्याने वाढून १४६.८ लाख झाली.
यंदा फेब्रुवारी महिन्यात भारतीय विमान कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या २८.५ लाख होती. आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवासी संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत ०.३ टक्क्यांनी आणि मागील तिमाहीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी कमी आहे. मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल – फेब्रुवारी कालावधीत ही संख्या ३३१.५ लाख होती. पश्चिम आशियाई संघर्षामुळे विमान टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) सरासरी किमतींमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत ९.२ टक्क्यांनी आणि वार्षिक तुलनेत १८.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान टर्बाइन इंधनाच्या दरवाढीवर २५ टक्क्यांची मर्यादा घातली असली तरी, तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल महिन्यात देशांतर्गत वाहतुकीसाठी विमान इंधानाच्या दरात केवळ ९.२ टक्क्यांनी वाढ केल्याने हवाई वाहतूक क्षेत्रावरील तात्काळ खर्चाचा परिणाम कमी झाला. तरीही, कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्याच आहेत.
