मुंबई : जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांक (एन्व्होरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स – इपीआय) २०२६ मध्ये १७७ देशांमध्ये भारत १७६ व्या स्थानी आहे. तसेच दक्षिण आशियातील आठ देशांमध्ये भारत शेवटच्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत असताना, पर्यावरण कामगिरी निर्देशांकातील भारताचे १७६वे स्थान चिंताजनक मानले जात आहे. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात हवा प्रदूषण, हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन आणि परिसंस्था संरक्षणाबाबत ठोस उपाययोजनांचा अभाव आदी मुद्देही अधोरेखित केले आहेत.

अमेरिका येथील येल आणि कोलंबिया विद्यापीठांसह विविध संशोधन संस्थांतील तज्ज्ञांकडून दर दोन वर्षांनी जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांक (एन्व्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स – इपीआय) प्रसिद्ध केला जातो. यात पर्यावरणासंदर्भातील विविध मुद्द्यांचा आढावा घेतला जातो. ज्यात पर्यावरणाची एकूणच स्थिती, जैवविविधतेचे संवर्धन याचबरोबर हवामान बदलाच्या समस्येवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक अहवालाची कार्यपद्धती निराळी असते, तसेच निर्देशकांमध्ये काही बदल करण्यात येतात. यंदाच्या अहवालात एकूण १७७ देशांचे ४७ पर्यावरणीय निर्देशांकाच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले असून त्याआधारे अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात भारताचा क्रमांक शेवटून दुसरा (१७६ वा) आहे. यात एकूण १०० गुणांपैकी भारताला केवळ २२.४६ गुण मिळाले असून दक्षिण आशियामधील देशातही भारताचे स्थान शेवटचे आहे. दरम्यान, या अहवालानुसार, एस्टोनियाने ७४.७९ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एस्टोनिया हा उत्तर युरोपातील एक छोटा देश आहे. तो बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसला असून बाल्टिक देशांपैकी एक आहे.

‘पर्यावरणीय आरोग्य’ या निकषात भारताचा १७४ वा, ‘परिसंस्था संवर्धना’त १७१ वा आणि हवामान बदलाच्या समस्येवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये १३० वा क्रमांक लागला आहे. भारतात विकास आणि प्रदूषण यांच्यातील वाढता संघर्ष अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. आधुनिक ऊर्जा सेवांचा विस्तार होत असताना शहरांमधील हवा प्रदूषण आणि हरितगृह वायूंच्या उत्सर्जनातही वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

गेल्या दहा वर्षांत हवेतील सूक्ष्म धूलिकण पीएम २.५, कार्बन मोनॉक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड यांसारख्या प्रदूषकांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक परिणामांमध्ये भारताची कामगिरी चिंताजनक आहे, असे अहवालात म्हटले आहे.तसेच सागरी संरक्षित क्षेत्रांच्या प्रभावी संरक्षणातही भारताची कामगिरी समाधानकारक नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या दक्षकभरात भारताच्या एकूण ईपीआय गुणांमध्ये ७.४७ गुणांची सकारात्मक सुधारणा झाल्याचेही अहवालात दिसून आले. काही हवा प्रदूषकांच्या उत्सर्जनवाढीचा वेग कमी झाला असला तरी कार्बन डायऑक्साइडसह हरितगृह वायूंचे उत्सर्जन अजूनही चिंतेचा विषय असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.