मुंबई : भारत आणि युरोपियन संघातील मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक लाभात रूपांतर करण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला आहे. या आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. बेल्जियमच्या उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुंबई आणि अँटवर्प यांच्यात आर्थिक भागीदारी विकसित करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

भारत, युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आयोजित भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह दोन्ही देशांतील उद्योग, बंदरे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील प्रतिनिधीही या संवादात सहभागी झाले होते. मुक्त व्यापार करार हा केवळ आयात शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नाही. विश्वासावर आधारित व्यापक आर्थिक भागीदारीचा पाया आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राची मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि विकसित औद्योगिक परिसंस्था, तर बेल्जियमची बंदरे, लॉजिस्टिक्स, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, रसायने, प्रगत उत्पादन आणि हरित तंत्रज्ञानातील क्षमता यामुळे दोन्ही घटक नैसर्गिक भागीदार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे १५ टक्के वाटा आहे. देशात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास एक तृतीयांश गुंतवणूक राज्यात येते. देशातील सुमारे ६६ टक्के डेटा सेंटर क्षमताही महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आर्थिक केंद्र, पुणे अभियांत्रिकी, वाहन आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्याच्या आर्थिक क्षमतेला आणखी चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०३० पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-बेल्जियम सहकार्यासाठी प्रगत उत्पादन व हरित उद्योग, सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स, स्वच्छ ऊर्जा, औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान, बंदरे, लॉजिस्टिक्स आणि दळणवळण या पाच क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. बेल्जियमची सेमीकंडक्टर संशोधन संस्था ‘आयमेक’ आणि महाराष्ट्रातील विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये भागीदारी विकसित करण्याची अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. हरित हायड्रोजन, औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, चक्रीय अर्थव्यवस्था, वैद्यकीय उपकरणे आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांतही संयुक्त प्रकल्प उभारण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

जवाहरलाल नेहरू बंदर आणि वाढवण येथील प्रस्तावित खोल समुद्री बंदरामुळे महाराष्ट्राची सागरी क्षमता वाढत आहे. अँटवर्प,ब्रुज बंदर आणि महाराष्ट्रातील बंदर व्यवस्थेमध्ये डिजिटलायझेशन, हरित नौवहन, हायड्रोजन, लॉजिस्टिक्स आणि कौशल्य विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला. अँटवर्प हे जगातील प्रमुख हिरे व्यापार केंद्र, मुंबईतील भारत डायमंड बोर्स हे भारतातील हिरे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असल्याने दोन्ही शहरांमध्ये केवळ हिरे व्यापारापुरती नव्हे, तर वित्त, तंत्रज्ञान, बंदरे, लॉजिस्टिक्स आणि शाश्वत विकासासाठीही भागीदारी विकसित करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारत-ईयू मुक्त व्यापार करारामुळे सुमारे दोन अब्ज ग्राहकांची बाजारपेठ परस्परांशी जोडली जाणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील सुमारे एक चतुर्थांश हिस्सा या भागीदारीत येतो, असे बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांनी सांगितले. हा करार केवळ व्यापाराचा नसून परस्पर विश्वास, सन्मान आणि धोरणात्मक भागीदारीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय वस्त्रोद्योग, पादत्राणे, यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग तसेच कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्राला यामुळे युरोपीय बाजारपेठेत संधी वाढतील, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. बेल्जियमचे तंत्रज्ञान, भांडवल आणि नवोन्मेष यांना भारतातील कौशल्य, युवा मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ यांची जोड मिळाल्यास दोन्ही देशांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. बेल्जियममधील उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी राज्य शासन स्वतंत्र पथक नियुक्त करणार आहे. निवडक गुंतवणूक प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे.