मुंबई : कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांना बळ देणारी महत्त्वाची कामगिरी करीत आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी लिमिटेड यांनी संयुक्तपणे देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरीत्या पूर्ण केली. शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक अंमलबजावणी यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम मानला जात असून, भारताच्या हवामान बदलविरोधी प्रयत्नांत तो महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागाने देशातील प्रमुख कोळसा क्षेत्रांमध्ये कार्बन साठवणुकीची शक्यता तपासण्यासाठी सविस्तर अभ्यास केला. या अभ्यासाअंतर्गत चार मोठ्या कोळसाक्षेत्रांचा आढावा घेऊन प्रथमच भूवैज्ञानिक साठवणुकीचा नकाशा तयार करण्यात आला. या संशोधनाच्या आधारे झारखंडमधील उत्तर करनपुरा कोळसा क्षेत्रातील पाकरी – बरवाडीह परिसरात देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक चाचणी विहीर खोदण्यास सुरुवात करण्यात आली.
सुमारे १,२०० मीटर खोलीपर्यंत खोदलेली ही विहीर १५ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. याच ठिकाणी दुसऱ्या विहिरीचे कामही सुरू करण्यात आले असून, या दोन्ही विहिरींच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साइड सुरक्षितपणे जमिनीत साठवता येते का, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. या उपक्रमासाठी एनटीपीसीची संशोधन शाखा ‘नेट्रा’ आणि आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे काम केले.
प्राथमिक अभ्यासानुसार उत्तर करनपुरा कोळसा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्बन साठवणूक शक्य असल्याचे निदर्शनास आले. भविष्यात याचा व्यावसायिक पातळीवर विचार करता येऊ शकतो. यापूर्वीही आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी यांनी कार्बन पकड व उपयोगाशी संबंधित विविध प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. त्या अनुभवाच्या आधारावर सध्याचा उपक्रम अधिक भक्कम ठरत असून, देशाच्या दीर्घकालीन कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा प्रकल्प नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा स्वदेशी संशोधनाधारित उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी समाधान व्यक्त केले. देशाच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी अशा प्रकल्पांची भूमिका निर्णायक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग यांनी सांगितले. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी संशोधन प्रत्यक्ष क्षेत्रात उतरल्यामुळे भारताच्या ऊर्जा संक्रमण प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रकल्पप्रमुख विक्रम विशाल यांनी हा उपक्रम केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट केले.
