मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून उष्णतेची लाट किंवा सदृश्य स्थिती जाहीर करण्याचे सध्याचे निकष हे भारतातील भौगोलिक स्थितीला अनुकूल नसल्याने भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि विभागाशी संबंधित असणारे इतर विभाग लवकरच भारतात उष्णतेची लाट जाहीर करण्याचे निकष अद्यावत करणार आहेत.

जागतिक पातळीवर हवामानात बदल होत असून भारतातही हवामानात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत आहेत. यंदा भारतात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून उष्णतेची तीव्रताही वाढली आहे. राज्यातही सध्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती मागील काही दिवसांपासून कायम आहे.

उष्णतेची लाट किंवा सदृश्य स्थिती हवामान विभागाकडून जाहीर केली जाते आणि त्यानुसार ती स्थिती किती दिवस राहील याचे अंदाजही हवामान विभागाकडून प्रसिद्ध केले जात असतात. सध्या देशातील राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद होत असून अनेक भागात उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हवामान विभागाकडून मैदानी प्रदेश, पठारी भाग आणि किनारपट्टीसाठी उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती जाहीर करण्याचे वेगवेगळे निकष वापरण्यात येतात. सध्या केरळ राज्यात हवामान विभागाकडून वापरण्यात येणाऱ्या निकषांच्या मर्यादेमुळे उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती जाहीर करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर निकषांचा भारतीय भौगोलिक स्थितीनुसार विचार करण्यात येणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात तीव्र उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. तसेच यंदा प्रथमच हवामानाचे अंदाज हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ विकसित होणाऱ्या प्रतिचक्रवाती स्थितीच्या आधारे देण्यात आले होते.

दरम्यान, यंदा जून प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून ही स्थिती दीर्घकाळपर्यंत राहणार आहे. यामुळे उष्णतेत वाढ होऊन उष्णतेच्या लाटाही वाढणार आहेत, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.