मुंबई : जागतिक आरोग्य व्यवस्थेत मेडिकल डिव्हाईस उद्योगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून तंत्रज्ञानाधारित उपचार आणि निदान पद्धतींमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. कोविड-१९ महामारीनंतर या उद्योगाचे महत्त्व अधिक ठळक झाले असून जगभरात उत्पादन, संशोधन आणि नवकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमूवर भारतात मेडिकल डिव्हाईस उद्योग झपाट्याने वाढत आहे.

जागतिक पातळीवर मेडिकल डिव्हाईस उत्पादनात अमेरिका आघाडीवर असून एकूण बाजारातील मोठा वाटा तिच्याकडे आहे. त्याचबरोबर जर्मनी, जपान आणि चीन हे देशही या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जर्मनी सर्जिकल आणि इमेजिंग उपकरणांमध्ये प्रबळ मानला जातो तर जपान अचूक तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. चीनने गेल्या काही वर्षांत स्वदेशी उत्पादनावर भर देत या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. स्वित्झर्लंड आणि आयर्लंडसारखे देश उच्च तंत्रज्ञान आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध आहेत.

दरम्यान, भारतात मेडिकल डिव्हाईस क्षेत्राला ‘सनराईज सेक्टर’ म्हणून ओळख मिळत असून उद्योग झपाट्याने वाढत आहे. सध्या भारत हा आशियातील चौथा आणि जागतिक स्तरावर टॉप २० बाजारांपैकी एक मानला जातो. देशातील मेडिकल डिव्हाईस बाजाराचा आकार सुमारे १२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून २०३० पर्यंत तो ५० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तथापि, या वाढीसोबतच काही गंभीर आव्हानेही कायम आहेत. देशातील सुमारे ७० ते ८० टक्के मेडिकल डिव्हाईस अजूनही आयातीवर अवलंबून आहेत. विशेषतः एमआरआय, सीटी स्कॅन आणि रोबोटिक सर्जरीसारख्या अत्याधुनिक उपकरणांमध्ये परदेशी कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे किंमत आणि उपलब्धतेत मोठी तफावत निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मेडिकल डिव्हाईस क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध धोरणात्मक पावले उचलली आहेत. नॅशनल मेडिकल डिव्हाईस पॉलिसी २०२३, प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना, तसेच विविध राज्यांमध्ये मेडिकल डिव्हाईस पार्क उभारणी यांसारख्या उपक्रमांमुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीलाही परवानगी देण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, वेअरेबल उपकरणे आणि टेलीमेडिसिन यांसारख्या तंत्रज्ञानामुळे मेडिकल डिव्हाईस क्षेत्रात पुढील काही वर्षांत मोठे बदल होणार आहेत. भारताने या संधीचा लाभ घेत स्वदेशी उत्पादन वाढवले तर तो जागतिक मेडिकल डिव्हाईस उत्पादन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो. जागतिक स्पर्धेत भारत वेगाने पुढे सरकत असला तरी आयात अवलंबित्व कमी करणे आणि उच्च तंत्रज्ञानातील स्वावलंबन साधणे ही आगामी काळातील सर्वात मोठी आव्हाने ठरणार आहेत.