मुंबई : गेली दोन वर्षे देशभर झालेल्या समाधानकारक पावसानंतर यंदा मात्र पाऊस ओढ देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. युद्धा, वाढती महागाई यांमध्ये येत्या काळात दुष्काळसदृश परिस्थितीचा भर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा यंदाच्या मोसमी पावसाचा पहिला अंदाज सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार देशभरात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही पाऊस कमी होईल.

भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. यात राज्यात यंदा सरासरीहून कमी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिमी विक्षोभ, उष्णता सदृश्य परिस्थिती अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या राज्यातील नागरिकांच्या समस्या यंदा आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात यंदा मोसमी पावसाच्या हंगामात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षीच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ६६ टक्के इतकी आहे.

महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाऊस कमी का होणार?

यंदा प्रशांत महासागरात ”एल निनो” सक्रिय होण्याची शक्यता आहे. एल निनोचा भारतातील मोसमी पावसावर परिणाम होतो. तसेच हिंदी महासागरात मोसमी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल (आयओडी) चा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘ला निना ’ स्थितीत मादागास्करकडे उतरलेले थंड वारे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून भारतात मान्सून आणतात. त्यामुळे ‘ला निना’ स्थिती भारतासाठी पोषक आहे. याउलट ‘एल निनो’चा परिणाम भारतातील मान्सूनवर होऊन पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.

आयओडी का महत्वाचे ?

 पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल किंवा सकारात्मक हिंदी महासागर डायपोलला कधीकधी ”भारतीय निनो”ही म्हटले जाते. सकारात्मक आयओडीच्या दरम्यान मान्सूनमधील पावसावर सकारात्मक तर नकारात्मक आयओडीच्या दरम्यान मान्सूनमधील पावसावर प्रतिकूल परिणाम होतो. प्रशांत महासागरता ”एल निनो” सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर सध्या हिंदी महासागरात आयओडी तटस्थ स्थितीत आहे. नव्या हवामान अहवालांच्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात सकारात्मक आयओडी स्थिती विकसित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.