मुंबई : देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मंगळवारअखेर (१४ जानेवारी) देशभरात ६३२.२७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गव्हाची पेरणी उच्चांकी क्षेत्रावर झाली आहे. पाण्याची चांगली उपलब्धता आणि चांगली थंडी पडल्यामुळे गव्हाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा देशात गव्हाचे उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवारअखेर ( १४ जानेवारी) देशभरात एकूण ६३२.२७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण पेरण्यांमध्ये गहू, मका, बार्ली आणि मोहरीच्या पेरण्यांनी आघाडी घेतली आहे. देशभरात रब्बी हंगामात सरासरी ३१२.३५ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी होते, यंदा ३२० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीपेक्षा साडेसात लाख हेक्टरने गव्हाच्या पेरणीत वाढ झाली आहे. चांगल्या पावसाळ्यामुळे गहू उत्पादक पट्ट्यात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. अपेक्षित थंडीही पडत आहे. त्यामुळे यंदा उच्चांकी गहू उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण

केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना दिल्यामुळे मका लागवडीखालील क्षेत्रात दिवसोंदिवस वाढ होत आहे. मक्याची कोणत्याही हंगामात लागवड केली जाते. त्यामुळे वर्षभर मका लागवड होत असते. तरीही खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे आहेत. रब्बीत देशात सरासरी २२.११ लाख हेक्टरवर मका लागवड होते. यंदा २२.३७ लाख हेक्टरवर मका लागवड झाली आहे. मका लागवडीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. बार्लीचे सरासरी क्षेत्र ५.७२ लाख हेक्टर असून, चालू हंगामात ६.६२ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.

तेलबियांच्या लागवडीत मोहरीने आघाडी घेतली आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मोहरीची लागवड केली जाते. सरासरी ७६.१६ लाख हेक्टर मोहरीचे क्षेत्र आहे, यंदा ८८.५० लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. देशातील रब्बीतील एकूण तेलबिया लागवडीखालील क्षेत्र ८७.०२ लाख हेक्टर आहे. यंदा ९६.८२ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी तेलबियांची १०१.८० लाख हेक्टरवर लागवड झाली होती.

यंदाच्या हंगामात गहू लागवड सरासरीपेक्षा जास्त आहे. अनुकूल स्थितीमुळे उत्पादनही बाराशे लाख टनांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. देशातून गहू आणि गव्हाचे पीठ, रवा, मैदा निर्यातीवर बंदी आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात गहू उपलब्ध असेल, दरही स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

राजेश शहागहू, तांदळाचे व्यापारी, निर्यातदार

पिके लागव

पिके लागवड क्षेत्र (लाखात)

गहू ३२०

भात २२.०९

कडधान्ये १३९.८१

श्रीअन्न, तृणधान्ये ५३.५५

तेलबिया ९६.८२

एकूण ६३२.२७