मुंबई: ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन केंद्र विकसित करणार असून खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच २६० मीटर उंचीचा दर्शन मनोरा (व्हिविंग टॉवर) उभारला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कासारवडवली येथे भव्य परिषद सभागृह, कोलशेत येथे २५ एकरमध्ये टाऊन पार्क, आगरी कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क,ॲडव्हेंचर पार्क, १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर व ५० एकरमध्ये अत्याधुनिक क्रिडा संकुल उभारले जाणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.
ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून १८.४ किलोमीटर लांबीचा आनंदवन हरित पट्टा विकसित केला जाणार आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध होणार आहेत, तसेच ठाणेकरांचे जीवनमान उंचावणार असून ठाण्याचा विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
यातील बहुतेक प्रकल्पांचीनिविदा प्रक्रिया सुरु झाली असून हे सर्व प्रकल्प बांधा- वापरा- हस्तांतरित करा( बीओटी) तत्वावर विकसित केले जातील, असेही त्यांनी सांगितले. ठाणे खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच दर्शन मनोरा उभारला जाणारअसून तेथून ठाणे शहर आणि परिसराचे विहंग सौंदर्य अनुभवता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
