मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची सागरी खाद्य निर्यात विक्रमी ७२,३२५.८२ कोटी रुपयांवर (सुमारे ८.२८ अब्ज डॉलर) पोहोचली आहे. एकूण १९.३२ लाख टनांची निर्यात झाली आहे. त्यात कोळंबीचा वाटा सर्वाधिक आहे. सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (एमपीईडीए) दिली आहे.

सागरी उत्पादनांच्या निर्यात गोठविलेल्या कोळंबीचा मुख्या वाटा असून, कोळंबी निर्यातीचे मूल्य ४७,९३७.१३ कोटी रुपयांचे (सुमारे ५.५१ अब्ज डॉलर) आहे. कोळंबीचा निर्यातीचा वाटा दोन-तृतीयांश पेक्षा जास्त आहे. कोळंबीच्या वाढत्या निर्यातीमुळे भारताचे सागरी उत्पादनांच्या निर्यातीत वर्चस्व निर्माण झाले आहे.

भारतातून सर्वाधिक निर्यात अमेरिकेला झाली असून, एकूण निर्यात मूल्य २.३२ अब्ज डॉलर इतके झाले आहे. अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीच्या प्रमाणानुसार (वजन) १९.८ टक्क्यांनी वाढले आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया पडल्यामुळे आणि आयात शुल्कात वाढ केल्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत मूल्यात १४.५ टक्क्यांची घट झाली आहे. दरम्यान, चीन, युरोपीय महासंघ आणि आग्नेय आशियाई देशांसारख्या पर्यायी बाजारपेठांमधील दमदार वाढीमुळे ही घट भरून निघाली आहे. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे निर्यात केंद्र असलेल्या चीनला होणारी निर्यात मूल्यानुसार २२.७ आणि प्रमाणानुसार २०.१ टक्क्यांनी वाढली आहे.

युरोपीय महासंघाने जोरदार वाढ नोंदवली आहे. निर्यातीमध्ये मूल्यानुसार ३७.९ टक्के तर प्रमाणानुसार ३५.२ टक्क्याने वाढ झाली आहे. आग्नेय आशियाई देशांत निर्यात वृद्धी झाली आहे. अनेक स्वतंत्र बाजारपेठांमध्ये दमदार वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे अमेरिके सारख्या पारंपरिक बाजारपेठांमधील व्यापारविषयक आव्हानांना अधिक सक्षमपणे तोंड देता आले. विशाखापट्टणम, जेएनपीटी, कोची, कोलकाता आणि चेन्नई या पाच आघाडीच्या बंदरांवरून निर्यात होत असून, या बंदरावरून होणारी निर्यात एकूण निर्यातीच्या सुमारे ६४ टक्के आहे.