मुंबई : बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण, तासन्‌तास संगणकासमोर बसून काम करण्याची पद्धत आणि मोबाईल-इंटरनेटच्या अतिवापरामुळे भारतात शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून यामुळे देश गंभीर आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा इशारा प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून देण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतातील जवळपास निम्मे प्रौढ नागरिक जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेल्या किमान शारीरिक हालचालीचे निकष पूर्ण करत नाहीत. परिणामी हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कर्करोगाचे काही प्रकार आणि अकाली मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

अभ्यासानुसार भारतातील ४९.४ टक्के प्रौढ नागरिक आवश्यक तेवढा व्यायाम किंवा शारीरिक श्रम करत नाहीत. जागतिक सरासरी ३१ टक्के असताना भारतातील हे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण ५७ टक्के असून पुरुषांमध्ये ते ४२ टक्के आहे. त्यामुळे महिलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन दशकांत भारतीयांच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल झाले आहेत. पूर्वी चालणे, सायकल चालविणे किंवा घरगुती व शारीरिक श्रमाची कामे मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र आता कार्यालयीन कामाचे वाढलेले तास, घरपोच सेवा, खासगी वाहनांचा वाढलेला वापर आणि मोबाईल, संगणक व दूरचित्रवाणीसमोर घालवला जाणारा वेळ यामुळे दैनंदिन हालचाल लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही यांत्रिकीकरणामुळे शारीरिक श्रम घटत असल्याचे चित्र आहे.

या बैठ्या जीवनशैलीचा परिणाम आता आरोग्य व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय नियमित व्यायामाचा अभाव मानसिक आरोग्यावरही परिणाम करत असून नैराश्य, तणाव आणि झोपेच्या समस्याही वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रत्येक प्रौढाने आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा किंवा ७५ मिनिटे तीव्र व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र भारतातील जवळपास निम्मे नागरिक ही किमान अटही पूर्ण करत नसल्याने भविष्यात असंसर्गजन्य आजारांचे ओझे आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अहवालात आणखी एक धक्कादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्याचीच परिस्थिती कायम राहिल्यास २०३० पर्यंत भारतातील शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण ६० टक्क्यांच्या आसपास पोहोचू शकते. यामुळे आरोग्य सेवांवरील खर्च वाढण्याबरोबरच देशाच्या उत्पादकतेवर आणि अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.आरोग्य तज्ज्ञांनी या पार्श्वभूमीवर शारीरिक हालचालीला दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन केले आहे. दररोज किमान अर्धा तास वेगाने चालणे, सायकल चालविणे, योगाभ्यास, मैदानी खेळ किंवा नियमित व्यायाम करण्याबरोबरच कार्यालयांमध्ये दीर्घकाळ सलग बसणे टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मुलांमध्ये मैदानी खेळांची सवय वाढविणे, पादचारी आणि सायकलस्नेही पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबविणे ही सरकार आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

भारतात संसर्गजन्य आजारांबरोबरच जीवनशैलीशी संबंधित आजारांचे वाढते आव्हान लक्षात घेता, शारीरिक हालचालीकडे दुर्लक्ष करणे आता परवडणारे राहिलेले नाही. नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली हीच भविष्यातील आरोग्यदायी भारताची गुरुकिल्ली असल्याचा स्पष्ट संदेश ‘द लॅन्सेट’च्या अहवालातून देण्यात आला आहे.