मुंबई : आखाती युद्धामुळे युरिया आणि युरिया निर्मितीसाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. आयात होणारा नैसर्गिक वायू घरगुती वापरासाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे प्रकल्पांना क्षमतेच्या केवळ ६० टक्केच नैसर्गिक वायू पुरविला जात आहे. दुसरीकडे वार्षिक देशभाल, दुरुस्तीसाठी देशातील बहुतेक युरिया निर्मिती प्रकल्प बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे युरिया संकट अधिक गडद झाले आहे.
देशाला दरवर्षी सुमारे ३८७ ते ४०० लाख टन युरिया खताची गरज असते. त्यापैकी सुमारे ३०० लाख टन युरियाची देशात निर्मिती होते. त्यासाठी प्रामुख्याने आखाती देशातून येणाऱ्या नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. पण, सध्या युद्धामुळे आखाती देशातून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. आयात होणारा नैसर्गिक वायू प्राधान्याने घरगुती वापरासाठी दिला जात आहे. त्यामुळे देशातील विविध युरिया निर्मिती प्रकल्पांना क्षमतेच्या किंवा मागणीच्या ६० टक्केच नैसर्गिक वायू पुरविला जात आहे. त्यामुळे नैसर्गिक वायू अभावी युरिया उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
देशभरातील युरिया निर्मिती प्रकल्पांचा मार्च – एप्रिल हा देखभाल, दुरुस्तीचा काळ असतो. त्यामुळे बहुतांश प्रकल्प या दोन महिन्यात देखभाल दुरुस्तीसाठी बंद असतात. सध्या देशभाल दुरुस्तीसाठी बहुतेक प्रकल्प बंद आहेत. युद्धजन्य स्थिती आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे सहा एप्रिलपासून प्रकल्पांतून युरिया निर्मिती सुरू होणार आहे, अशी माहिती फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाकडून देण्यात आली.
डीएपी, एमओपीचे जहाजे होर्मुजमध्ये अडकली
डाय- अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि मुरेट ऑफ पोटॉशची (एमओपी) अगाऊ मागणी आणि नोंदणी केलेली दोन जहाजे होर्मुजच्या सामुद्रधुनीत अडकली आहेत. संबंधित जहाज कंपन्या आणि विमा कंपन्या वाहतुकीसाठी असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे रशिया, युक्रेन, बेलारूस, कॅनडा, अमेरिकेसह आखाती देशातून येणारी तयार खते आणि खतांच्या कच्च्या मालाची आयात विस्कळीत झाली आहे.
नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढविला जाणार
देशातील खत कंपन्या, केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालय आणि केंद्रीय कृषी मंत्रालय सतत संपर्कात आहेत. नैसर्गिक वायू, खत निर्मितीसाठीचा कच्चा माल आणि तयार खतांच्या आयातीचा आढावा दररोज घेतला जात आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत होताच खत कंपन्याचा पुरवठा वाढविला जाणार आहे. महाराष्ट्राला प्राधान्याने राज्यासह गोवा आणि गुजरातमधील कंपन्यांमध्ये उत्पादीत होणाऱ्या युरियाचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती खत उद्योगाचे जाणकार विजयराव पाटील यांनी दिली.
