मुंबई : मागील काही दिवसांपासून भारतातील विशेषतः उत्तरेच्या राज्यात पश्चिमी विक्षोभामुळे वादळी स्थिती निर्माण झाली असून यामुळे तुफान पाऊस, गारपीट तर काही ठिकाणी बर्फवृष्टीची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाची नोंद झाली. मंगळवारी एक नवीन पश्चिमी विक्षोभ (वादळ) सक्रिय होणार असून यामुळे देशाच्या उत्तरेच्या राज्यांमध्ये पुन्हा जोरदार वादळी पाऊस, गारपीट आणि बर्फबवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशातील हवामानासह राज्यातील हवामानात मागील काही दिवसात झपाट्याने बदल होत असून यामुळे अस्थिर हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीलाच तीव्र उन्हाचा सामना करावा लागणाऱ्या विविध राज्यात सध्या पावसाळी हवामान आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होत असून पुढील काही दिवसात उष्णता वाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, पुन्हा ७ ते ९ एप्रिल दरम्यान देशातील अनेक भागात वादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानात बदल होऊ शकतात असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.

मध्य पाकिस्तानवर असणारा पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव भारतीय उपखंडाच्या दिशेने वेगाने सरकत असून हवामान अभ्यासकांच्या मते, सोमवारी रात्रीपासून पश्चिम राजस्थानात त्याचे परिणाम दिसू शकतात. मंगळवार रात्रीपर्यत उत्तरेच्या बहुतांश राज्यात पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार आहे. एका मागून एक येणाऱ्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे भारतातील बहुतांश भागात पावसाळी हवामान आहे.

राज्याची स्थिती काय असेल ?

सध्या राज्यात पावसाळी हवामानाचा प्रभाव कमी होत असून यामुळे बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. पुढील काही दिवस विदर्भातील काही भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तरेकडील वादळाचा प्रभाव राज्यात मर्यादित राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. तसेच सध्या राज्यातील कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. यामुळे तीव्र उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही तसेच त्यानंतर हळूहळू कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सोमवारी ‘यलो अलर्ट’ कुठे ?

सोमवारी विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता असून चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.