मुंबई : आंतरराष्ट्रीय गणित आणि भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने सौदी अरेबियातील रियाध शहरात रंगलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. यंदा या स्पर्धेत ९४ देशांतील (५ निरीक्षक देशांसह) ३२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. देशनिहाय पदकतालिकेत यंदा भारत अकराव्या स्थानी आहे.
यंदा सौदी अरेबियातील रियाध शहरात २१ ते ३० जुलै या कालावधीत ५६ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे (आयसीएचओ २०२४) आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्यार्थ्यांच्या संघातील महाराष्ट्रातील जळगावमधील देवेश पंकज भैया याने सुवर्ण पदक पटकावले. मुंबईतील अवनीश बन्सल आणि तेलंगणामधील हैद्राबाद येथील हर्षिन पोसीना यांनी रौप्य पदकांची कमाई केली. तर मुंबईतील कश्यप खंडेलवाल याने कांस्य पदक जिंकले.
या स्पर्धेसाठी भारताच्या शिष्टमंडळाचे प्रमुख नेतृत्व मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयातील माजी प्रा. गुलशनारा शेख आणि साहाय्यक नेतृत्व रसायन तंत्रज्ञान संस्थेतील डॉ. श्रद्धा तिवारी यांनी केले. त्यांच्यासमवेत दिल्लीतील आचार्य नरेंद्र देव महाविद्यालयातील प्रा. सीमा गुप्ता आणि पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील शासकीय सर्वसाधारण पदवी महाविद्यालयातील डॉ. अमृत मित्रा यांनी वैज्ञानिक निरीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पदक विजेत्यांना व प्राध्यापकांना मुंबईतील मानखुर्दमधील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र व टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ३१ जुलै रोजी गौरविण्यात येणार आहे.
© The Indian Express (P) Ltd