मुंबई: खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयांतील चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला एक रौप्य आणि चार सुवर्ण पदके प्राप्त झाली आहेत. यात पुण्याच्या चहल सिंग याने सुवर्ण तर मुंबईच्या ध्रुव अहलावत याने रौप्य पदक मिळवले आहे.

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयांच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन यंदा कोलंबियाने केले होते. ही स्पर्धा १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन झाली. यात भारतीय चमूतील सर्व विद्यार्थ्यांनी पदके पटकावली.  चहल आणि ध्रुवसह फरिदाबादचा अनिलेश बन्सल, हीसरचा सुरेन, मिरूतचा अर्हान अहमद यांनीही सुवर्ण पदके मिळवली आहेत.  सामूहिक स्पर्धेत भारतीय चमूला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. पदतालिकेत भारताचा क्रमांक थायलंड आणि रशिया यांच्या समवेत पहिला होता. यंदा स्पर्धेतील भारतीय चमूचे यश हे आतापर्यंतचे या स्पर्धेतील सर्वात मोठे यश आहे. गुणवत्ता यादीत अनिलेश बन्सल याने दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत ५२ देशांतील ६२ संघांच्या माध्यमातून २९८ विद्यार्थी सहभागी झाले होते.