मुंबई : इराण-अमेरिका संघर्षामुळे जगातील हवाई वाहतुकीला फटका बसला आहे. युद्धाच्या ४० दिवसांत भारतीय विमान कंपन्यांची १० हजार उड्डाणे रद्द झाली आहेत. पूर्वी भारतीय कंपन्यांच्या विमानांची दररोज मध्य पूर्वेला (येण्या-जाण्याच्या मिळून) सुमारे ३०० ते ३५० उड्डाणे होत असत. आज हा आकडा ८०-९० पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे विमान कंपन्याना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. संघर्षामुळे इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये हवाई हद्द बंद करण्यात आली. प्रमुख वाहतूक मार्ग बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांना विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील काही विमान सेवा बंद करण्यासह मार्ग बदलावे लागले.
जागतिक जेट इंधन पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के पुरवठा मध्य पूर्वेतून होतो. भारतीय विमान कंपन्यांना, विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना लांबचा मार्ग घ्यावा लागल्याने प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढला आहे. प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवरील प्रवासाचे अंतर १०-१५ टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. त्यासह कर्मचाऱ्यांचा खर्च वाढण्यासह कामकाजातील गुंतागुंतही वाढली. भारतीय कंपन्यांच्या एकूण आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी ५० टक्के उड्डाणे पश्चिम आशियासाठी असतात. आंतरराष्ट्रीय सेवा हा महसुलाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे आताच्या युद्धाचा भारतीय विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
वैमानिकांच्या कर्तव्य वेळ मर्यादेत तात्पुरती शिथिलता नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) लांब पल्ल्याची उड्डाणे करणाऱ्या वैमानिकांसाठी उड्डाण कर्तव्य वेळ मर्यादेत तात्पुरती शिथिलता मंजूर केली आहे. कामकाजातील व्यत्यय आणि वैमानिकांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या शिथिलतेअंतर्गत, अनुज्ञेय उड्डाण वेळ आणि कर्तव्य कालावधी वाढवला आहे. ३० एप्रिलपर्यंत वैध असलेली ही शिथिलता, कर्मचाऱ्यांची कमतरता कमी करण्यास मदत करेल.
युद्धाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांमध्ये, पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी एमिरेट्स, कुवेत एअरवेज आणि जझीरा यांसारख्या परदेशी विमान कंपन्यांना सर्व मालवाहतूक सेवांसाठी प्रवासी विमाने चालवण्यासाठी विशेष परवानगी दिली होती.
