मुंबई : भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘इक्रा’च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये भारतीय विमान कंपन्यांचा एकूण निव्वळ तोटा तब्बल ३६,००० ते ३८,००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतातील विमान प्रवासी आणि हवाई वाहतूक वाढत असली, तरी कंपन्यांचा वाढता खर्च आणि बाह्य परिस्थितीमुळे या क्षेत्राची आर्थिक स्थिती खालावली आहे. वाढत्या हवाई इंधनाच्या वाढत्या किंमती, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेला व्यत्यय आणि प्रवासी वाहतुकीतील घट यामुळे विमान कंपन्यांचा तोटा वाढत आहे.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारतीय हवाई उद्योगाला २८ ते ३० हजार कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याचा अंदाज आहे. विमान कंपन्यांना वाढता परिचालन खर्च, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि विमानांच्या भाडेपट्टीत वाढ यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने, चालू आर्थिक वर्षातही नफ्यातील ही घसरण सुरूच राहण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर २०२६ मध्ये देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील १२६.४ लाखांच्या तुलनेत वार्षिक ६.५ टक्यांनी घटून ११८.२ लाख झाली. ऑगस्ट महिन्यातील १२१.३ लाखांच्या तुलनेतही वाहतूक २.५ टक्यांनी घटली. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत, देशांतर्गत प्रवासी वाहतूक वार्षिक १.९ टक्यांनी घटून ७८६.१ लाख झाली. देशांतर्गत विमान कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये सुमारे ८२,८४५ उड्डाणे केली. गेल्या वर्षीच्या ९०,११२ उड्डाणांच्या तुलनेत यंदा ८.१ टक्यांची वार्षिक घट आहे.
इंधनाचा खर्च विमान कंपन्यांसाठी इंधनाचा खर्च ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये देशांतर्गत विमानसेवेसाठीच्या विमान इंधन दरात मागील महिन्याच्या तुलनेत १३.२ टक्यांनी वाढ झाली, ज्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत प्रति किलोलिटर १६ हजार रुपयांनी वाढ झाली. ऑक्टोबर २०२५ च्या तुलनेत या किमती ४६.२ टक्के जास्त होत्या. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत, इंधनाच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत २४.१ टक्के वाढ झाली.
प्रमुख विमान कंपन्यांची सद्यस्थिती
इंडिगो : ६० टक्क्यांहून अधिक बाजारपेठेवर ताबा असलेली इंडिगो देखील तोट्यात आली आहे. सप्टेंबर २०२६ च्या तिमाहीत तब्बल २४,३११.९ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करूनही कंपनीला १,८७९.१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.
एअर इंडिया : आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा संयुक्त निव्वळ तोटा वाढून २२,२३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अकासा एअर आणि स्पाइसजेट या कंपन्याही आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत.
तोट्याची मुख्य कारणे
– महागडे विमान इंधन : विमान कंपन्यांच्या एकूण वाहतूक खर्चापैकी सुमारे ४० ते ६० टक्के खर्च हा केवळ इंधनावर होतो. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत.
– रुपयाची घसरण : विमान कंपन्यांची कमाई रुपयात होते, मात्र विमानांचे भाडे , सुटे भाग आणि इंधनाचा खर्च डॉलरमध्ये करावा लागतो. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे कंपन्यांचा खर्च प्रचंड वाढला आहे.
– पश्चिम आशियातील संघर्ष व हवाई क्षेत्रावरील निर्बंध: युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे विमानांना वळसा घालून लांबच्या मार्गाने जावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा वापर वाढला आहे.
– प्रवासी वाहतुकीतील घट: महागाई आणि वाढत्या तिकिट दरांमुळे गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत काही प्रमाणात घट नोंदवली गेली आहे, ज्यामुळे कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
