मुंबई : सेनेच्या मूल्यव्यवस्थेचा पाया “स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ” या भावनेवर उभा आहे. सीमांवर कठीण परिस्थितीत काम करताना सैनिकांना त्याग आणि प्रसंगी सर्वोच्च बलिदान करण्याची प्रेरणा या मूल्यांतूनच मिळते. म्हणूनच नागरिक संरक्षण दलांकडे अंतिम आधार म्हणून पाहतात. सेनेला देशातील सर्वात विश्वासार्ह ‘ब्रँड’ मानले जाते, असे प्रतिपादन माजी लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी केले.
सेना ही केवळ संरक्षण करणारी संस्था नसून देशातील नागरिक ज्या मूल्यांकडे आशेने पाहतात त्यांचे सूक्ष्म प्रतिबिंब आहे. विविध धर्म, भाषा आणि प्रदेशांतील सैनिक एकाच ध्येयासाठी एकत्र काम करतात त्यामुळे सेना ही राष्ट्रीय एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण ठरते, असे त्यांनी नमूद केले. कोणत्याही संस्थेचा डीएनए तिच्या मूल्यांमध्ये दडलेला असतो. चांगली रणनीतीही मजबूत संस्कृतीशिवाय निष्फळ ठरते. युद्धासारख्या परिस्थितीत दुसरा क्रमांक नसतो. त्यामुळे सेनेत जिंकण्याचे संस्कार जोपासले जातात. संघटनात्मक संस्काराचे चार प्रमुख पैलू मांडताना त्यांनी ‘लीड बाय एक्झॅम्पल’, ‘नाम-नमक-निशान’ ही संकल्पना, कुटुंबवत्सल संबंध आणि आयुष्यभर टिकणारी मैत्री यांवर प्रकाश टाकला. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले नाते हे सेवेपुरते मर्यादित नसून आयुष्यभराचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सेनेतील सात मूलभूत मूल्यांचा उल्लेख करताना त्यांनी निष्ठा, कर्तव्य, आदर, स्वार्थरहित सेवा, सन्मान, प्रामाणिकपणा आणि वैयक्तिक धैर्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. शारीरिक धैर्याइतकेच नैतिक धैर्यही आवश्यक आहे. संघभावना, कॅमरेडरी आणि धर्मनिरपेक्षतेचा आदर्शही सेनेची ओळख आहे, असे त्यांनी नमूद केले.
देशाच्या भविष्यातील नेतृत्व घडवण्यात तरुणांची भूमिका निर्णायक असून नेतृत्वाचे सर्वात उत्तम धडे सशस्त्र दलांच्या अनुभवांतून मिळतात. देश प्रगतीच्या मार्गावर असून तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत, समाजासाठी योगदान द्यावे आणि देशप्रेमाला प्रेरणा मानावे, असे आवाहन करत त्यांनी कठोर परिश्रम, नम्रता, करुणा आणि सहिष्णुता ही मूल्ये अंगीकारण्याचा सल्ला दिला.
योद्ध्यांची चार सूत्रे
योद्ध्यांच्या चार सूत्रांचा उल्लेख करताना ध्येय प्रथम, पराभव न स्वीकारणे, कधीही हार न मानणे आणि जखमी सहकाऱ्याला न सोडणे हे संघभावनेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांसाठी चार सी
तरुणांसाठी चार ‘सी’ महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी चारित्र्य, धैर्यपूर्ण नेतृत्व, क्षमता आणि बांधिलकी यांचे महत्त्व पटवून दिले. आव्हाने आणि अपयश तात्पुरते असते. पुन्हा उभे राहण्याची जिद्द आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती जोपासावी, असा संदेश त्यांनी दिला.
